A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सखि मुखचंद्र भ्रांत

सखि मुखचंद्र भ्रांत न करो मनासी ।
खर पाप तेंहि वचनांहीं वमाया ॥

कुवचां विधाता शिकवील कैसा? ।
विधुकिरणिं तमभाव होई कधी काय? ॥
गीत - न. ग. कमतनूरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- बापू पेंढारकर
नाटक - श्री
राग - खंबावती
ताल-झपताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
विधु - चंद्र.
पहिल्या आवृत्तीचीं शेवटी पानें

मला नाटक लिहिता येणे शक्य नाहीं, असें मला वाटत होतें; व आतांहि थोडेंफार माझें तेंच मत कायम आहे. परंतु माझे परमस्‍नेही, नटवर्य रा. रा. गणेश गोविंद बोडस, यांनीं, बेताबेतानें मला धीर देऊन, आस्ते आस्ते अथपासून इतिपर्यन्त, माझ्याकडून ही 'श्री' लिहविली. सांगावयाचें म्हणजे, पुढें 'गणेशा' नसता तर ही 'श्री' लिहिली गेलीच नसती. तयार झालेल्या नाटकाला रंगभूमीच्या योग्य मार्गाला लावतांना सुद्धां रा. रा. गणेश गोविंद बोडस, यांनीं जें माझ्याबद्दल निरपेक्ष प्रेम दाखविलें त्याचा कोणत्या शब्दांनीं कसा उल्लेख करावा व त्याबद्दलची कृतज्ञता कशी व्यक्त करावी, तेंच मला कळेनासें झालें आहे !

'श्री' नाटक सन १९२३ च्या अखेरीस लिहून झालें; व तें आतां म्हणजे सन १९२६ च्या अखेरीस रंगभूमीवर आलें. रंगभूमीचें दर्शन घेण्यास जो 'श्री'ला इतका अवधि लागला, तो केवळ नाइलाज म्हणूनच लागला. व्यवहारचातुर्यापेक्षां मित्रप्रेमाचा ओजच अधिक कामिं लावून, 'श्री' नाटक थाटामाटानें रंगभूमीवर आणल्याबद्दल, मी, माझे मित्र रा. रा. व्यंकटेश बलवंत पेंढारकर, मालक ललितकलादर्श मंडळी, यांचा अत्यंत आभारी आहे.

त्याचप्रमाणें, 'ललितकलादर्श मंडळीं'तील सर्व नटांनीहि, 'श्री'ला जनतेसमोर आणतांना स्‍नेहधर्माची जी कळकळ दाखविली, तीबद्दल मी त्यांचाहि अत्यंत आभारी आहे.

दिसायला मूल कसेंहि असो, तें मूल कोणाचेंहि असो, थोर माणसांना तें मूल असतें म्हणूनच प्रिय वाटतें. तशांतून त्या मुलाची आपुलकी वाटत असल्यास कौतुकाला सीमाच राहत नाहीं. 'श्री' कशीहि असली तरी ती आपली आहे, या प्रेमैक विचारानें प्रेरित होऊन, महाराष्ट्राच्या पूर्ण परिचयाचे संगीताचार्य रामकृष्णबुवा वझे यांनी आपल्या ठेवणींतील नमुनेदार ठळक अलंकार घालून श्रीला खूपच नटविली आहे. गाण्यांतील नमुनेदार विजांनी 'श्री' ला सजवून, बुवासाहेबांनीं तिला खेळविलें हसविलें असल्यानें त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेनें माझें अंतःकरण भरून येत आहे.

अनुस्वारापासून अक्षरापर्यंत व अक्षरापासून शब्दापर्यंतच्या चुका या पुस्तकांत झालेल्या दिसून येतील. पुस्तक छापण्यास जी अत्यंत घाई झाली तीमुळे त्या चुका राहिलेल्या आहेत इतकें सांगून व त्या सर्व दोषांबद्दल एकवार वाचकांची क्षमा मागून 'श्री' नाटकांतील हीं शेवटची पानें पुरी करतों.
(संपादित)

नरहर गणेश कमतनूरकर
दि. १० डिसेंबर १९२६
'श्री' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- चित्रशाळा प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.