शुभमंगल चरणी गण
शुभमंगल चरणी गण नाचला
नाचला कसा तरी पाहु चला
सार्या अंगांनी रस आचिवला
छत्तीस रागिन्या बसल्या उशाला
जन सार्या तालासूरावर
वर खर खर सम वाचिवला
रोचिवला नवरस सगळा
येचिवला उल्हास आगळा
उगळा निगळा मनोवेगळा खोचला
शुभमंगल चरणी गण नाचला
गण वाकड्या सोंडेचा
गण हत्तीच्या पिंडाचा
अगं पाऊल पडता त्याचा
छुम छुम छुम छुम छननन
छुम छ्ननन वाजे
घुंगराचा गजर जेथे साचला
शुभमंगल चरणी गण नाचला
गणपती नाचुनी गेल्या पाठी
शेंदुर ठेवला कोणासाठी
पठ्ठे बापूराव कवीची धाटी
हट्टी मराठी बालेघाटी
खबर आणली मग शंभर नंबरी
वर वर वरची भर भर पुढची
शाहूनगरची कोल्हापूरची
पल्ला थेट पंचगंगेला नीट रस्ता पोचला
शुभमंगल चरणी गण नाचला
नाचला कसा तरी पाहु चला
सार्या अंगांनी रस आचिवला
छत्तीस रागिन्या बसल्या उशाला
जन सार्या तालासूरावर
वर खर खर सम वाचिवला
रोचिवला नवरस सगळा
येचिवला उल्हास आगळा
उगळा निगळा मनोवेगळा खोचला
शुभमंगल चरणी गण नाचला
गण वाकड्या सोंडेचा
गण हत्तीच्या पिंडाचा
अगं पाऊल पडता त्याचा
छुम छुम छुम छुम छननन
छुम छ्ननन वाजे
घुंगराचा गजर जेथे साचला
शुभमंगल चरणी गण नाचला
गणपती नाचुनी गेल्या पाठी
शेंदुर ठेवला कोणासाठी
पठ्ठे बापूराव कवीची धाटी
हट्टी मराठी बालेघाटी
खबर आणली मग शंभर नंबरी
वर वर वरची भर भर पुढची
शाहूनगरची कोल्हापूरची
पल्ला थेट पंचगंगेला नीट रस्ता पोचला
शुभमंगल चरणी गण नाचला
| गीत | - | शाहीर पठ्ठे बापूराव |
| संगीत | - | वसंत पवार |
| स्वर | - | छोटा गंधर्व |
| चित्रपट | - | पठ्ठे बापूराव |
| गीत प्रकार | - | चित्रगीत, प्रथम तुला वंदितो, लोकगीत |
| आगळा | - | अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण. |
| बालेघाट | - | घाटमाथा, घाटावरील प्रदेश. |
पठ्ठे बापूराव यांच्या तमाशा फडाने मुंबई तर जिंकलीच, शिवाय महाराष्ट्राच्या दर्याखोर्यांतून पठ्ठे बापूरावांची कवने भिरभिरू लागली. मराठी मुलखानं तमाशा कलेचा ऐन जोश अनुभवला. पठ्ठे बापूरावांचा हा ऐन वैभवाचा काळ होता.
पवळा-पठ्ठे बापूराव यांचा गाजत असलेला तमाशा फड पुण्याला आला. तिथं तर अफाट लोकप्रियता मिळाली. ज्या पुण्याने पेशवाईचे वैभव भोगले, विद्या आणि संस्कृतीची नगरी म्हणून ज्याचा नावलौकिक दुमदुमला, अनेक विद्वान पंडितांचे माहेरघर पुणे, जिथं अनेक शाहिरांची रसवंती रमली होती, त्या पुण्याने पठ्ठे बापूरावांच्या जीवनातील लोकविलक्षण काळ पाहिला.
महाराष्ट्रात एकीकडे राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक गाजत होते. दुसरीकडे राजमान्य बालगंधर्व सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. नाट्यक्षेत्रात राम गणेश गडकरी आपल्या नाटकांनी मराठी रंगभूमीला अलौकिक लौकिक मिळवून देत होते, त्याच काळात तमाशा या लोककलेचा राजा लोकशाहीर शीघ्रकवी पठ्ठे बापूराव मराठी मनावर अधिराज्य गाजवत होते.
पुण्यात तर पठ्ठे बापूरावांचा तमाशा फड ऐन रंगात आला. पुण्याने पेशवाईच्या काळात 'बैठ्या लावणीचे' तमाशे पाहिले. पण पठ्ठे बापूरावांच्या ढोलकीवरील तमाशाने, कलगी-तुर्याच्या ईर्षेबाज खेळांनी मात केली.
या पुण्यात त्या काळी इब्राहीम थिएटर, आर्यभूषण थिएटर, सतरंजीवाला चौक थिएटर ही थिएटरे गजबजून जात. खेडेगावातील शोकिन बैलगाड्या जुंपून येत. बैलगाड्यांच्या रांगाच्या रांगा लागत.
अर्जुना वाघोलीकर, दगडू साळी, शिवा कौलापूरकर, केसनंदकर आणि पठ्ठे बापूराव यांच्या चुरशी झडत. लढती होत. भेदिकाचे सवाल-जवाब रंगत. या खेळांच्या सामन्यासाठी इनाम ठेवले जाई. जिंकणार्या कलावंताला रेशमी मंदिल, दोन तोळ्याची सलकडी, सोन्याच्या गिन्या बक्षीस मिळत.
त्यावेळी सोने १८ ते २० रु. तोळा होते. १५ रुपयांची सोन्याची गिनी असे. हे इनामाचे जिन्नस थिएटराच्या मुख्य दरवाजावर केळीचे खांब उभे करून त्यावर दहीहंडीसारखे बांधून ठेवीत. थिएटर गर्दीने फुलून जाई. सवाल-जवाबाच्या अभ्यासासाठी तमासगिरांच्याजवळ ग्रंथांची गोठोडी असत.
पठ्ठे बापूरावांचा ग्रंथाभ्यास दांडगा होता. त्यांनी या बहुश्रुततेच्या व खतना शाहिरीच्या जोरावर आणि पवळाच्या नृत्यनिपुणतेच्या चापल्यावर अनेक सामने जिंकले. त्यांना अंगठ्यांच्या व गिन्यांच्या अगणित बिदाग्या मिळत.
पवळाच्या सहवासाने पठ्ठे बापूरावांचे कवित्व अधिकच खुलत होते. रोज नवी लावणी लेखणीतून उतरे. लय आणि प्रास यामुळे त्यांच्या लावण्या बंगदार, रंगदार बनत. रंगबाजीच्या लावण्यांनी लोक वेडे होत. भेदिकात ओवलेल्या आध्यात्म्याने लोकांची मनं खुलून जात. त्यांच्या लावण्यांचे मुखडे महाराष्ट्रभर ज्याच्या त्याच्या मुखी होऊन गेले होते. इतर मुलखावरचे तमासगीर पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांनी आपल्या तमाशात बहार उडवत.
त्या काळापासून आजपर्यंतही लोकांच्या तोंडी असलेले उदाहरणावजा मुखडे मुद्दाम नोंदवीत आहे,
• शुभ मंगल चरणी गण नाचला ।
• लवकर यावे सिद्ध गणेशा । आतमधी कीर्तन वरून तमाशा ।
• नको मक्का मदिना काशी । तुझा नारायण तुजपासी ।
• तू ऐक नंदाच्या नारी । काल दुपारी, यमुनेच्या तिरी गं ।
• सोळा हजारात देखणी ।
• नंद गोकुळी छंद लागला नाद गौळणीचा गे ।
आधी नारायण विष्णू ओंकार मी अवतार त्याचा गे ।
• मुंबई नगरी बडी बाका ।
• गाडी आणावी भुरक्याची ।
• ही नटरंगी नार । करी काळजात वार ।
• लाखात अशी देखणी ।
• तू गं कोणाची मदनमंजरी ।
• किती देवा, तू कठोर मनाचा । कोणाचे तू केले बरे ।
• जे का तुझ्या भक्तीशी लागले । तितुक्यांची बुडविली घरे ।
• दसरा गेला । दिवाळी आता येईल उद्या परवा ।
राया मला जरतारी शालू। आणा पैठणचा हिरवा ।
(संपादित)
• लवकर यावे सिद्ध गणेशा । आतमधी कीर्तन वरून तमाशा ।
• नको मक्का मदिना काशी । तुझा नारायण तुजपासी ।
• तू ऐक नंदाच्या नारी । काल दुपारी, यमुनेच्या तिरी गं ।
• सोळा हजारात देखणी ।
• नंद गोकुळी छंद लागला नाद गौळणीचा गे ।
आधी नारायण विष्णू ओंकार मी अवतार त्याचा गे ।
• मुंबई नगरी बडी बाका ।
• गाडी आणावी भुरक्याची ।
• ही नटरंगी नार । करी काळजात वार ।
• लाखात अशी देखणी ।
• तू गं कोणाची मदनमंजरी ।
• किती देवा, तू कठोर मनाचा । कोणाचे तू केले बरे ।
• जे का तुझ्या भक्तीशी लागले । तितुक्यांची बुडविली घरे ।
• दसरा गेला । दिवाळी आता येईल उद्या परवा ।
राया मला जरतारी शालू। आणा पैठणचा हिरवा ।
(संपादित)
प्रा. चंद्रकुमार नलगे
'महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव' या प्रा. चंद्रकुमार नलगे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख