राधा उरली नव्हती राधा, श्याम हरवला होता
वृंद फुलांचा डुलला होता
भृंग त्यावरी भुलला होता
हेमंत न मज कळला जोवर, वसंत फुलला होता
गीत गायिले तेच ओठ हे
सुधा प्राशिली तेच पात्र हे
आले नाही तरीही गाणे, तो तर गेला होता
जवळी माझ्या होते सारे
श्वासापुरते नव्हते वारे
रथात बसले तरि, अनवाणी पथ हा झाला होता
तोच अचानक वाजे पावा
धावे राधा, मिटे दुरावा
आसमंत हा अवघा आता श्यामच झाला होता
गीत | - | पुष्पलता देसाई |
संगीत | - | बाळ बर्वे |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत |
पावा | - | बासरी, वेणु. |
वृंद | - | समुदाय. |
बाळ बर्वे हे अगदी विलक्षण संवेदनशील होते. अनेक सामाजिक, व्यक्तिगत गोष्टींबद्दल बोलताना त्यांचे डोळे पाणावलेले अनेकांनी पाहिले आहेत.
१९७२-७३ मध्ये माणिकताईंना मॅनेंजायटिस झाला होता. त्यांना 'शुश्रुषा'मध्ये दाखल केलं गेलं होतं. याचा परिणाम म्हणून त्या नंतर नीट बोलू शकतील की नाही, याबद्दल डॉक्टरांनी त्यांच्या जवळच्यांकडे साशंकता दर्शवली होती. आभाळ कोसळणं म्हणजे काय असतं, ह्याचा अनुभव त्यावेळी ज्या व्यक्ती त्यांच्या जवळ होत्या, त्यांना आला होता ! गाणं तर दूरची गोष्ट होती.. पण बोलणं अशक्य? गंधर्वाचा गळा लाभलेल्या माणिक वर्मांच्या बाबतीत अशी कल्पना करणंही पाप होतं.
पण सर्व उपचार झाले. माणिकताई बर्या होऊ लागल्या.. संगीतक्षेत्रातल्या जवळच्या मंडळींचं त्यांच्या तब्येतीवर अशा तर्हेने लक्ष होतं की त्या 'गाऊ शकतात' ही खुशखबर कधी मिळते ! हळूहळू बोलण्याचा सराव करता करता एका शुभदिनी माणिकताईंना आत्मविश्वासाने वाटलं की त्या बोलूच नाही तर गाऊही शकतील आणि त्या गायल्या
त्यानंतर वर्षभर गेलं असेल. मार्च १९७५ चे दिवस होते . आकाशवाणीवरून माझ्या वडिलांना मे १९७५ करिता 'भावसरगम'चं एक गाणं करण्यासंबंधी विचारणा झाली. त्यांना हा सुवर्णयोग वाटला. त्यांनी कवयित्री कु. पुष्पलता देसाईंना थोडक्यात माणिकताईंची परिस्थिती सांगून जसं चित्रपटात एखाद्या प्रसंगाकरिता लिहून घेतात, तसं गाणं लिहून घेतलं. गाण्याचे शब्द तर पहा-
सूर हरवला होता माझा ऊर हरवला होता
राधा उरली नव्हती राधा, श्याम हरवला होता
इथून गीत सुरू होतं, आणि..
तोच अचानक वाजे पावा
धावे राधा, मिटे दुरावा
आसमंत हा अवघा आता श्यामच झाला होता
ह्या ओळी माणिकताईंचा आवाज घेऊन येतात.
कोणालाही काहीही न सांगता सर्व काही कळेल, इतकं भावपूर्ण गीत निर्माण झालं.
आता कसब होतं माझ्या बाबांचं ! गीत हातात आल्यावर काही तासांतच त्याची संपूर्ण चाल तयार झाली आणि बाबांनी थेट माणिकताईंचं घर गाठलं. त्यांच्या हातात कागद ठेवला आणि त्यावेळी सोबत नेलेल्या बासरीवर माणिकताईंना चाल ऐकवली मात्र !!!
शब्द आणि चाल ऐकून माणिकताईंना आणि तिथल्या उपस्थितांना अश्रू आवरेनात. काही आठवड्यातच आकाशवाणीवर हे गीत ध्वनिमुद्रीत झालं. मे १९७५चं 'भावसरगम' गीत !!
हेमंत बर्वे
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.