A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सूड घे त्याचा लंकापति

विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति
सूड घे त्याचा लंकापति

कसलें करिसी राज्य रावणा, कसलें जनपालन?
श्रीरामानें पूर्ण जिंकिले तुझें दंडका-वन
सत्तांधा, तुज नाहीं तरीही कर्तव्याची स्मृति

वीस लोचनें उघडुनि बघ या शूर्पणखेची दशा
श्रीरामाच्या पराक्रमानें कंपित दाही दिशा
तुझे गुप्तचर येउन नच का वार्ता सांगति?

जनस्थानिं त्या कहर उडाला, मेले खरदूषण
सहस्र चौदा राक्षस मेले हें का तुज भूषण?
देवासम तो सुपूज्य ठरला जनस्थानिंचा यति

तुझ्याच राज्यीं तुझ्याहुनीही पूज्य जाहला नर
सचिवांसंगे बैस येथ तूं स्वस्थ जोडुनी कर
जाळुन टाकिल तव सिंहासन उद्यां तयाची द्युति

सुदर्शनासह व्यर्थ झेलले छातीवर तूं शर
व्यर्थ मर्दिले देव, उचलिले सामर्थ्ये डोंगर
तूंच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापति?

तूंच काय रे कुबेर जिंकुन पुष्पक नेलें घरीं?
तूंच काय तो, हरिली ज्यानें तक्षकनृपसुंदरी?
तूंच काय तो भय मृत्यूचें लव नाहीं ज्याप्रति?

ऐक सांगतें पुन्हां तुला त्या श्रीरामाची कथा
बाण मारता करांत त्याच्या चमके विद्युल्लता
शस्त्रनिपुणता बघून त्याची गुंग होतसे मति

तो रूपानें रेखीव, श्यामल, भूमीवरती स्मर
त्याच्यासंगे जनककन्यका रतीहुनी सुंदर
तुलाच साजुन दिसेल ऐसी मोहक ती युवति

तिला पळवुनी घेउन यावें तुजसाठीं सत्वर
याचसाठिं मी गेलें होतें त्यांच्या कुटिरावर
श्रवणनासिका तोडुन त्यांनी विटंबिलें मज किती !

जा, सत्वर जा, ठार मार ते बंधू दोघेजण
हसली मज ती जनककन्यका, येइ तिज घेउन
माझ्यासम ते तव सत्तेची विटंबिती आकृति
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र हिंडोल
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- ७/१०/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- योगिनी जोगळेकर.
उच्छेद - समूळ नाश.
कुटिर (कुटी) - झोपडी.
कुबेर - देवांचा खजिनदार / श्रीमंत व्यक्ती.
खर-दूषण - रावणाचे सावत्र भाऊ. शूर्पणखेची रामाकडून विटंबना झाल्यामुळे खर आणि दूषण रामावर चालून गेले व त्याच्या हातून मरण पावले.
तक्षक - पाताळातील आठ प्रमुख नागांपैकी एक.
द्युति - प्रकाश.
दाशरथी - राम (दशरथाचा पुत्र).
नृप - राजा.
पुष्पक - कुबेराचे (देवांचा खजिनदार) विमान.
मति - बुद्धी / विचार.
यति - संन्यासी.
लव - सूक्ष्म.
शर - बाण.
शूर्पणखा - रावणाची बहीण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण