A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वयंवर झालें सीतेचे

आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे

श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
उभे ठाकलें भाग्य सांवळें समोर दुहितेचें

मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
फुलुं लागलें फूल हळुं हळू गालीं लज्जेचें

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे

हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे

पित्राज्ञेनें उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
अधीर चाल ती, अधीर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें

नीलाकाशीं जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेंच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झालें माया-ब्रह्माचे

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे

अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशीं जडलें नातें ऐसे धरणीचें
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र मांड
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १७/६/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
ठाकणे, ठाके - थांबणे / स्थिर होणे.
तडित - वीज.
दुहिता - कन्या.
नृप - राजा.
नृपति - राजा.
मैथिली - सीता (मिथिला नगरीची राजकन्‍या).

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण