A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तरुण आहे रात्र अजुनी

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?

अजूनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजून मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?

सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?

उसळती हुदयांत माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे?
सुरेश भटांची प्रतीकयोजना त्यांच्या गझलची परिणामकारकता वाढवण्यासाठी फारच उपयुक्त ठरते. प्रतिकवादाविषयी 'एल्गार'च्या प्रस्तावनेत सुरेश भट म्हणतात, "फक्त दोन ओळींच्या एकाच शेरात एक संपूर्ण विश्‍व सामावून घ्यायचे असल्यामुळे शब्दांच्या खोगीरभरतीला शेरात कुठे वाव नसतो. म्हणूनच प्रतीकात्‍मक शब्द वापरले जातात. या प्रतिकात्‍मक शब्दांचा परिणाम म्हणून एकाच शेराचे अनेक अर्थ लागतात. गझलेत दोन ओळींचा एक शेर एक 'थीम' हाताळतो आणि ती 'थीम' अगदी सहज रसिकांच्या हृदयात पोहोचवण्यासाठी कवी कवितेप्रमाणेच प्रतीकात्मक शब्दांचा उपयोग करतो."
'रंग माझा वेगळा' या कवितासंग्रहापासून प्रतीकांची ही अर्थवाही नाट्यपूर्ण काव्यशैली सुरेश भटांनी हळूहळू हस्तगत केलेली दिसते, ज्या शैलीला पुढे तेज आणि धार चढली.

'तरुण आहे रात्र अजुनी' ही शुद्ध प्रेमभावनेला वाहिलेली गझल. या गझलेत एका मीलनोत्‍सुक प्रेमिकेची वेदना व्यक्त करण्यासाठी सुरेश भटांनी अतीव हळुवार, मुलायम, मृदुल भाषा आणि प्रतीके वापरली आहेत. पूर्ण शारीरिक मीलन होता होताच दुरावलेल्या प्रियकराला ती प्रणयिनी आतून खट्टू होऊन म्हणते-
अजूनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजून मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?

या गझलेत अस्सल मराठी लावणीचा खट्याळ रुसवा आहे पण केवळ गझल वृत्ताचा वापर केल्याने, प्रतीकांची भाषा वापरल्याने या गीतातली देहोत्कटता गळून जाऊन केवळ मानसिक ओढीच्या पातळीवर हे प्रेमगीत जाऊन बसले आहे. गझलची भाषा पण अंतर्यामी गीतातले भाव, अशा स्वरूपाची ही भावकविता आहे.
(संपादित)

शिरीष पै
'सुरेश भट ह्यांची निवडक कविता' या शिरीष पै संपादित कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.