A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तशी जागा निवार्‍याला

तशी जागा निवार्‍याला कुठे माझ्या घरी होती?
पथारी टाकण्यासाठी जगाची ओसरी होती !

अशासाठीच मी माझे भरू नाही दिले डोळे,
तुम्ही हासाल, ही माझी कधीची खातरी होती !

सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा,
तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती !

मला फासावरी कोणी शहाणा सांगतो आहे-
'तुला संधी जगायाची मिळालेली बरी होती !'

जिथे गेलो, तिथे माझी नद्यांनी कौतुके केली..
कधी इंद्रायणी होती ! कधी गोदावरी होती !

अरे, ह्या जिन्‍दगानीची कधी मी काळजी केली?
मला सांभाळण्यासाठी मराठी वैखरी होती !
गीत - सुरेश भट
संगीत -
स्वर- सुरेश भट
गीत प्रकार - कविता
ओसरी - घराचा ओटा.
कांगावा - ढोंग, नाटक.
खातरी - खात्री.
पथारी - अंथरूण.
वैखरी - वाणी, भाषा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.