A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
थकले रे डोळे माझे

थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहतां
वाट तुझी पाहतां रे
रात्रंदिन जागतां

सुकला रे कंठ माझा
तुज आळवीतां
तुज आळवीतां रे
नाम तुझें जपतां

आटले रे अश्रु माझे
वाहतां वाहतां
वाहतां वाहतां रे
आठवणी काढतां

शिणला रे जीव माझा
तुजविणें राहतां
तुजविणें राहतां रे
तुज नच भेटतां
गीत - कवी अनिल
संगीत - यशवंत देव
स्वराविष्कार- उषा मंगेशकर
ज्योत्‍स्‍ना भोळे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - भावगीत, नयनांच्या कोंदणी
  
टीप -
• काव्य रचना- फेब्रुवारी १९२८.
• स्वर- उषा मंगेशकर, संगीत- यशवंत देव.
• स्वर- ज्योत्‍स्‍ना भोळे, संगीत- केशवराव भोळे.
  .
काही कविता ध्रुपदाच्या असतात. एकेक कडवे म्हंटले की पुन्हा ध्रुपदावर यावे लागते. काही पुढे जाणार्‍या असतात. उदाहरणार्थ, 'अजून नाही जागी राधा'. त्या शेवटपर्यंत गाऊनच संपवायच्या असतात. पुन्हा पहिल्या ओळीवर मध्येच आल्याने रसभंग होतो. कवीवर व त्याच्या कवितेवर अन्याय होतो. गायकाने कवीला असे खाऊन टाकू नये.

भावगीताला चाल लावताना हे एक शिल्प आहे या कल्पनेच्या आधाराने लावायची असते. आदि, मध्य, अंत हा क्रम ध्यानात ठेवून रचलेले ते एक शिल्पच असते. असेच एक शिल्प मी उभे केले ते अनिलांच्या 'आळवणी' या भावगीताच्या चालीत. त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह 'फुलवात' हा वारंवार चाळीत असता ह्या कवितेवर माझे डोळे खिळून राहत. अनिलांच्या तोंडून त्यांच्या अनेक कविता मी ऐकल्या पण ही कधीच ऐकली नव्हती. या कवितेवर चाल रचण्याच्या खटपटीत मी असताना १९४० साली एका रात्री ही चाल या सतत चिंतनामूळे जमू लागली. मुखडा सुंदर जमला. मी समोरच्या ऑर्गनवर बसलो आणि त्याच्या सहाय्याने पुढील चाल रचू लागलो. असा काही प्रतिभेचा वरदहस्त पडला की चाल ओळीओळींत्तून पुढे सरकू लागली. शेवटला रसाचा उत्‍कर्ष (आटले रे अश्रू माझे वाहता वाहता) तर अतिशय परिणामकारक झाला, मग 'शिणला ते कंठ माझा' या ओळीतील शीणही चालीत उतरण्यास उशीर झाला नाही. दोन तास निघून गेले असतील. चाल पक्की झाली पुन:पुन्हा तपासून तिला जिल्हई देण्याचे कामही संपले. इतकी मनाजोगती चाल झाल्यावर सकाळपर्यंत आपण विसरूनच जाऊ की काय, अशीच उगीच भीती वाटू लागली. सारे झोपले होते. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. ज्योत्‍स्‍नाबाईही शांतपणे पहिल्या झोपेची मजा चाखीत होत्या. कशाला यांना उठवावे, असेही क्षणभर वाटले. पण चालीचा लोभही सुटेना. मग निश्चय पक्का करून त्यांना उठवलेच. भलत्याच वेळी उठवले म्हणून त्या थोड्या दचकल्याच. पण उघडा असलेला ऑर्गन त्यांनी पाहिला आणि त्या सावरल्या.

मी चाल सांगू लागलो. त्या म्हणत गेल्या. तासाभरात चाल शिकवून झाली. त्यांना उत्तम बसली. आता चाल विसरली जाणार नाही म्हणून माझा जीव खाली पडला. त्यांना चाल फार आवडली म्हणून त्यांची झोपमोड केल्याचे दु:ख वाटले नाही. सकाळी तबलजी आल्यावर साथीचे धोरण पक्के केले. कवाली ढंगाने तबला वाजवणे अपरिहार्त होते. म्हणण्यात योग्य ठिकाणी खटकामुरक्या वगैरे मसाला घातला. स्थूल मानाने शिवरंजनी रागाचे स्वर सुचतासुचता आपोआप चढले. मग गरजेप्रमाणे वर्ज्य असलेले मध्यनिषादही चालीत आणावे लागले. ही चालही चढत्या रंगाची झाली आहे. प्रत्येक दुसरी ओळ खाली म्हंटल्यावरती पुढच्या ओळीवर जाण्यापूर्वी वर वर चढते. असा क्रम शेवटपर्यंत चालू राहतो.

भावगीत, त्याची चाल, तिचे म्हणणे एकंदरीत एका मेळाने यथासांग झाले. त्याची रेकॉर्डही उत्तम निघाली. या भावगीताला तबल्याची साथ नको होती, फक्त व्हायोलीनवर हे म्हणायला हवे होत, असे एकांचे मत पडले. मी त्यांना विचारले, "मग व्हायोलीन, तरी कशाला हवे?" त्यांना उत्तर देता आले नाही. मी आता पु. ल. देशपांड्यांच्या शब्दांत म्हणतो, "फक्त बदनामी पुरते की काय?"
(संपादित)

केशवराव भोळे
माझे संगीत- रचना आणि दिग्‍दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  उषा मंगेशकर
  ज्योत्‍स्‍ना भोळे