A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ती येते आणिक जाते

ती येते आणिक जाते,
येतांना कधि कळ्या आणिते,
अन्‌ जातांना फुलें मागते.

येणें-जाणें, देणें-घेणें
असतें गाणें जें न कधी ती म्हणते.
ती येते आणिक जाते..

येतांना कधि अशी लाजते
तर जातांना ती लाजविते :
कळते कांही उगीच तेंही,
नकळत पाही कांहीबाही,
अर्थावाचुन उगीच 'नाही.. नाही..' म्हणते.
ती येते आणिक जाते..

येतानांची कसली रीत :
गुणगुणते ती संध्यागीत
जातांना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी जी सलते.
ती येते आणिक जाते..
सल - टोचणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.