A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू अबोल हो‍उन जवळी मजला

तू अबोल हो‍उन जवळी मजला घ्यावे
मी भान विसरुनी धुंद चांदणे प्यावे

ही विशाल अवघी मृदुल असावी धरती
चांदवा रेशमी गर्द जांभळा वरती
वर चंद्ररुपेरी झुंबर एक झुलावे

क्षितिजांत झळकता मंद केशरी तारा
अंगावर घ्याव्या धवल दुधाच्या धारा
त्या धारांनी चिंब मला भिजवावे

कचबंध मोकळा तुझ्या करांनी व्हावा
मधुगंध मंदसा बकुलफुलांनी द्यावा
तूं चंद्रबनातिल स्वप्‍निल रंग टिपावे

सुकुमार साजरी झुळुक लाजरी यावी
हळु रातराणिचा बहर उधळुनी जावी
हे धुंद निरामय वैभव तू फुलवावे
कच - केस.
निरामय - निरोगी / स्वस्थ.