A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू असतीस तर झाले असते

तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाणे नवथर गाणे

बकुळीच्या पुष्पांपरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन्‌ रंगांनी भरले असते
क्षितिजावरले खिन्‍न रितेपण

पसरियली असती छायांनी
चरणतळी मृदुश्यामल मखमल
अन्‌ शुक्राने केले असते
स्वागत अपुले हसून मिष्किल

तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन-धरेतील धूसर अंतर
गीत - मंगेश पाडगांवकर
संगीत - गजानन वाटवे
स्वराविष्कार- रवींद्र साठे
सुरेश वाडकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - भावगीत, शब्दशारदेचे चांदणे
  
टीप -
• स्वर- रवींद्र साठे, संगीत- गजानन वाटवे.
• स्वर- सुरेश वाडकर, संगीत- मंदार आपटे.
नवथर - नवीन.

 

  रवींद्र साठे
  सुरेश वाडकर