A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तूं माझी अन्‌ तुझा मीच

'तूं माझी अन्‌ तुझा मीच' ही खातर ना जोंवरी
प्रीतिची हूल फुकट ना तरी !

गालाला पडते खळी मला पाहुनी
ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी !
भयभीत प्रीत थरकते लीन लोचनीं
ओठांची थरथरत पाकळी, बोल गडे, झडकरी !
प्रीतिची हूल फुकट ना तरी?

जिवाजिवाची अभंग जडली जोड असे ही जरी,
भीति मग कोणाची अंतरीं?
ही गांठ भिडेची तांत गळ्या लाविल
हिरव्याचीं पिवळीं पानें हीं होतिल !
प्रीतिच्या फुलाचा वास उडुनि जाइल
फसाल पुरत्या, बसाल गाळित घळघळ अश्रू-झरी !
प्रीतिची हूल फुकट ना तरी?
तांत - धागा / आतड्याची तार.