A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू तलम अग्‍नीची पात

तू तलम अग्‍नीची पात.. जशी दिनरात जळावी मंद
तू बंधमुक्त स्वच्छंद, जसा रानात झरा बेबंद
तू तलम अग्‍नीची पात..

लडिवाळ बटा, गुलजार छटा तू मृदुमायेचा हात
तो तंग चंद्र अन्‌ हले पालवी शीतळ संथ जळात
ही मखमालीची शेज सखे अन्‌ जळते दाहक अंग
ही रात चांदणी कोरत जाते पाण्यामधले रंग
तू तलम अग्‍नीची पात..

तू अल्लड नवथर, थरथर देही जसे थरथरे पाणी
त्या पाण्यावरला तरंग मी अन्‌ भास वेगळा राणी
रानात बहर, अंगात बहरले धुंदफुंदले श्वास
मीलनी मग्‍न ते सर्प जसे की टाकतात नि:श्वास
तू तलम अग्‍नीची पात..

या अवघड वेळी नकोच बोलू तव ओठांची भाषा
या रानालाही कळते अपुल्या डोळ्यांमधली भाषा
असे असावे जीवन आणि असे जुळावे नाते
ही रात असावी गात स्वरांनी तुझे नि माझे गाणे
तू तलम अग्‍नीची पात..
गीत- मल्लिका अमर शेख
संगीत - आनंद मोडक
स्वर - प्रभंजन मराठे
चित्रपट- मुक्ता
गीत प्रकार - चित्रगीत
नवथर - नवीन.
शेज - अंथरूण.