A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तू वर्णिल्या गृहाच्या

तू वर्णिल्या गृहाच्या सखिच्या खुणा मनांत
मी बाळगीन यक्षा जणु त्या इथे पहात

मंदारवृक्ष बाल, फुलता झुके डहाळी
वहिनी तयास माझी पुत्रासमान पाळी
जणु इंद्रचाप दारी, ते दृष्य तोरणात

तरु कांत केसराचा मदिरा मुखातही वा
फुलण्या अशोकवृक्ष मागेल पाय डावा
सखिचा तुझ्या दिसेल वासंतिमांडवात

कांता तुझी जयाला तालांत नाचवील
नादांत कंकणांच्या निळकंठ तो दिसेल
ओट्यावरी मण्यांच्या बसण्यास त्यास वेत

आलसात चालणारी पुढती असेल लीना
नाभी सखोल, व्हावा मृगभास लोचनांना
बिंबाधरा कृशांगी कुंदासमान दात

मितभाषिणी, जणूं ती विरहात चक्रवाकी
झुरते वियोग सहते नि:श्वास दीर्घ टाकी
वाटेल पद्म शिशिरी बदलून रूप घेत
गीत - डॉ. वसंतराव पटवर्धन
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर- रामदास कामत
गीत प्रकार - गीत मेघ, मालिका गीते
  
टीप -
• गीत क्रमांक ६
• 'गीत मेघ' - अनुवादित 'मेघदूत'मधून
• वाहिनी- सह्याद्री, कार्यक्रम - 'प्रतिभा आणि प्रतिमा' (१९८०)
• निवेदन- ज्योत्‍स्‍ना किरपेकर
• सादरकर्ते- अरुण काकतकर
• ध्वनीफीत सौजन्य- डॉ. वसंतराव पटवर्धन
कांता - पत्‍नी.
चाप - धनुष्य.
नाभी - बेंबी.
बिंबाधरा - पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल ओठ असणारी.
पहिले कडवे -
कल्पद्रुमाकडूनी अलकेत घेत नारी
चरणास रंग, मदिरा नेत्रांत रंगणारी
भेटेन भावजयिला नगरात, त्या घरात

तिसरे कडवे -
पाचूत बांधलेली वापीत पायरी ती
जणू पुष्कराज देठीं पद्में सुवर्ण फुलती
क्रीडानगास नीळ जो हेमकर्दळीत

सहावे कडवे -
मी शंख पद्मचिन्हे दारापुढे बघेन
नसता तुझा निवास वाटेल शांत म्लान
कमळास काय शोभा जंव भास्करास अस्त

आठवे कडवे -
देवास पूजिता वा पुसण्यास सारिकेला
ठाकेल पिंजर्‍याशी चित्रिल प्रतनु तुजला
किंवा असेल वहिनी स्वप्‍नांत भ्रांतचित्त