तुज स्वप्नी पाहिले रे
तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला !
जमल्या ललना चतुरा
मोदे स्वागत करण्याला
आळविती कुणी सुरस रागिणी
कोमल मंजुळ वाणी
तव श्रांत वदन शमवाया
नंदकिशोरा सुखवाया
झुळुझुळु वायुही आला
थांबती विहगही नभी या
पसरुनी शीतल छाया
दिपतील नयन तुझे रे म्हणुनी
रविवरी मेघमालिका जमुनी
अंजिरी पडदा महीवरी धरला
जमल्या ललना चतुरा
मोदे स्वागत करण्याला
आळविती कुणी सुरस रागिणी
कोमल मंजुळ वाणी
तव श्रांत वदन शमवाया
नंदकिशोरा सुखवाया
झुळुझुळु वायुही आला
थांबती विहगही नभी या
पसरुनी शीतल छाया
दिपतील नयन तुझे रे म्हणुनी
रविवरी मेघमालिका जमुनी
अंजिरी पडदा महीवरी धरला
| गीत | - | दत्ता डावजेकर |
| संगीत | - | दत्ता डावजेकर |
| स्वर | - | लता मंगेशकर |
| राग / आधार राग | - | दरबारी कानडा |
| गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
| मही | - | पृथ्वी. |
| मोद | - | आनंद |
| विहंग | - | विहग, पक्षी. |
| श्रांत | - | थकलेला, भागलेला. |
| सुरस | - | मधुर. |
'नवयुग चित्रपट लि.' पुणे येथे मा. विनायक यांचे तर्फे एक लहान मुलगी दत्ता डावजेकर यांचे कडे 'टेस्ट घ्या' असा निरोप घेऊन आली. फ्रॉक घातलेली व केसांना भरपूर तेल माखलेली सावळी मुलगी पुढे उभी राहिल्यावर डावजेकरांनी विचारले, 'तुला गाणे येते का?' मुलीने होकार दिला. गाणे सुरू करण्यास सांगितले. तेव्हा तिने मा. दीनानाथांचे प्रसिद्ध नाट्यगीत अशा काही तयारीने गायले की डावजेकरांची पेटी वाजविताना तारांबळ उडाली. डावजेकरांनी मुलीला गाणे थांबवून विश्रांती घेण्यास सांगितले व ते तडक मा. विनायकांकडे गेले. 'माझ्याकडे पाठविलेली मुलगी कोण हो? तिला काही केल्या हातची गमावू नका.' डावजेकरांनी सांगितले. मा. विनायक म्हणाले, "डी.डी., तुम्हाला माहीत नाही?"
ही मा. दीनानाथांची मुलगी लता मंगेशकर !" १९४२ मधली ही गोष्ट !
(संपादित)
सौजन्य- श्री भारत बुक डेपो, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख