A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझे रूप सखे गुलजार असे

तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा ग ध्यास जडे
हा छंद जिवाला लावि पिसे!

ती वीज तुझ्या नजरेमधली
गाली खुलते रंगेल खळी
ओठांत रसेली जादुगिरी
उरि हसति गुलाबी गेंद कसे!

नखर्‍यांत तुझ्या ग मदनपरी
ही धून शराबी दर्दभरी
हा झोक तुझा घायाळ करी
कैफांत बुडाले भान असे!

ती धुंद मिठी, बेबंद नशा
श्वासांत सखे विरतात दिशा
बेहोश सुखाच्या या गगनी
मी आज मला हरवून बसे!
गीत- वंदना विटणकर
संगीत - श्रीकांत ठाकरे
स्वर - महंमद रफी
गीत प्रकार - भावगीत
काहूर - मनातील गोंधळ, बेचैनी.
पिसे - वेड.