A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझी नि माझी प्रीत जशी

तुझी नि माझी प्रीत जशी रे देव्हार्‍यातील ज्योत
झळकत नाही तळपत नाही, तेवत जाई संथ

तुझी नि माझी प्रीती साजणा बकुळफुलांची माळ
कुठेही ठेवा कशीही ठेवा, सुगंध दे चिरकाल

तुझी नि माझी प्रीती राजसा जणू यमुनेचे पाणी
किती युगे जपलेली तेथे हरीमुरलीतील गाणी

तुझी नि माझी प्रीती अहाहा भैरवीमधले गीत
सुरासुरांतून भाव झिरपती मधुर परंतु आर्त

तुझी नि माझी प्रीती शोभना ज्ञानेशाची ओवी
अनुरागाची सुंदर सुमने अद्वैतातची ओवी
गीत - वसंत बापट
संगीत - गजानन वाटवे
स्वर- मोहनतारा अजिंक्य
गीत प्रकार - भावगीत