A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
टुमदार कुणाची छान

टुमदार कुणाची छान नवति भरज्‍वान पुसा रे आलि कुठून
स्वरुपाचे तुटती तारे कडारेकड विजवा पडतिल तुटून

पान खाउन ओठ करि लाल अंगावर शाल झळकती चुडे
गजगति चाले हळूहळू उरिं ग जोबन उमटले हुडे
वय अटकर बांधा लहान
हरपलों पाहुन भुकतहान
कर अर्पण पंचीप्राण- रणीं ग जाऊं कटून

गगनांत चांदणी ठळक मारिशी झळक उभि ग अंगणीं
किति नटुनथटुन मारिशील छनाछन नैनाच्या संगिणी
झालों घावाविण घायाळ
झोंबला विखारी व्याळ
जणुं टाहो करि कोयाळ
तूं न कळे घालशी माळ- कोणाला गे उठून
कोयाळ - कोकिळ.
जोबन - तारुण्य.
नवती - तरुणी / तारुण्य.
व्याळ - साप.
विखारी - विषारी.
संगीन - व्यवस्थित / मजबूत, पक्का / बंदुकीच्या अग्रभागी लावण्याचे सुर्‍यासारखे शस्‍त्र.
हुडा - बुरुज.
मूळ स्वरुपात-

टुमदार कुणाची छान नवति भरज्‍वान पुसा रे आलि कुठून
स्वरुपाचे तुटती तारे कडारेकड विजवा पडतिल तुटून

छबिदार सुरत फांकडी बुंद राखडी जडुन वर खडे
गुंफिली वेणि नागिणि लडा र गालांवर दोहीकडे
पान खाउन ओठ करि लाल अंगावर शाल झळकती चुडे
गजगति चाले हळु हळू उरिं ग जोबन उमटले हुडे
वय अटकर बांधा लहान
हरपलों पाहुन भुकतहान
कर अर्पण पंचीप्राण
रणीं ग जाऊं कटून

वय बारा-तेरांत ऐन आलि भरांत भुइ ग ठेंगणी
दंडिं बाजुबंद बाहुट्या सर पहुच्या हिरे जडले कंगणीं
गगनांत चांदणी ठळक मारिशी झळक उभि ग अंगणीं
किति नटुनथटुन मारिशील छनाछन नैनाच्या संगिणी
झालों घावाविण घायाळ
झोंबला विखारी व्याळ
जणुं टाहो करि कोयाळ
तूं न कळे घालशी माळ
कोणाला गे उठून

तो दूरदेश बंगाल मुलुख कंगाल गेलों सलासैल आलों करून
नाहिं धनदौलतिला कमी आणिले उंट मालाचे भरून
चाहिल तें माग या घडि देइन बिनधडी ताजवा धरून
तुझे भारोभार देईन सखे खैरात करीन तुजवरून
असा हेत मनामधिं धरून
राहिलों रुपाला भुलून
चार महिने तुजसाठिं ठरून
मजा [सखे] दे पटून

घरिं चला राजअंबिरा गूणगंभिरा पाहिलें कसून
वचनाचा करावा मान करिन सन्‍मान पलंगी बसून
विठु परशरामाचा नक्ष चहुंकडे दक्ष पहा जा पुसून
गातो रामकृष्ण रामाचे तोड मूळ वस्तादापासून
नवशिके ठाउके बेसूर
चाल बदलुन गाती टौर
घरोघरीं वाजविती डौर
जशि अक्षतिजेची गौर
काय तिशीं रे झटून

संदर्भ-
म. वा. धोंड
मर्‍हाटी लावणी
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई