A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुम्ही माझे बाजीराव

माझ्यासाठी दिली राहुटी, इतरांना मज्जाव
तुम्ही माझे बाजीराव

मी मस्तानी हिंदुस्तानी बुंदेली पहेराव
झिरझिरवाणी निळी ओढणी, वाळ्याचा शिडकाव

तुम्ही मराठे नव्हे छाकटे, अगदी सरळ स्वभाव
शूर शिपाई तुमची द्वाही, चारी मुलखी नाव

उभी अंगलट तांबुस फिक्कट, नयनी दाटला भाव
बोलावाचुन घ्या जी वाचून अर्जी आविर्भाव

काल दुपारी भर दरबारी उरी लागला घाव
मी पण चळले तुम्हा भाळले आता नाही निभाव

दिठीदिठीचा नजरमिठीचा हो‍ऊ द्याच सराव
या पायांशी मज दासीसी मिळेल का कधी वाव?
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर- आशा भोसले
चित्रपट - वैजयंता
गीत प्रकार - चित्रगीत, लावणी
छाकटा - छचोर.
द्वाही - दवंडी.
राहुटी - तंबू.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.