A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्या पैलतिरावर मिळेल मजला

त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा
सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा!

इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे
जळतात पावलांखाली क्रुद्ध निखारे
मी तळमळताही निर्विकार जन सारे
पण तिथे वाहतो प्रसन्‍न शीतल वारा!

ऐकली न येथे आपुलकीची बोली
बहरली न आशा मनात अंकुरलेली
सारखी विफलता, व्यथा माझिया भाली
पलीकडे हासतो जीवन-श्रेय-फुलोरा!

पलीकडे मनोमय स्वप्‍नांचा संसार!
पलीकडे सुगंधित गीतांचा झंकार!
संतप्त उरास्तव वत्सल अमृतधार!
बहरला मळ्यांनी वैभवपूर्ण किनारा!
गीत- सुरेश भट
संगीत - नरेंद्र भिडे
स्वर - हृषिकेश रानडे
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• पुणे आकाशवाणी नभोमालिका 'आनंदलोक' मधील पद.
ध्वस्त - नष्ट केलेले किंवा झालेले.
वत्सल - प्रेमळ.
श्रेय - पुण्य / कल्याण.