A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी रात टाकली

मी रात टाकली
मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची, बाई लाज टाकली

हिर्व्या पानांत, हिर्व्या पानांत चावळ चावळ चालती
भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती

ह्या पंखांवरती
मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाऽई, चांदन्यात न्हाती

अंगात माझिया
भिनलाय ढोलिया
मी भिंगर भिवरी त्याची गोऽ मालन झाली
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलात न्हाली
मालण(न) - (सुंदर) स्‍त्री.
'जैत रे जैत' या चित्रपटाच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाच्या पहिल्या सत्रामध्ये पहिलंच गाणं ध्वनिमुद्रित होणार होतं..
'मी रात टाकली..'

मला या ध्वनिमुद्रणाला हजर रहायचं भाग्य लाभलं. एच.एम.व्ही.च्या रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये लताबाई वाद्यवृंदाबरोबर रिहर्सल करत होत्या. मी लताबाईंपासून चार-पाच फुटांवर उभा होतो. पण त्या गात असलेले शब्द अगर सूरही मला भोवतीच्या वाद्यवृंदामुळे ऐकू येत नव्हते. टेकच्या वेळी मी ध्वनिमुद्रकाच्या दालनात जाऊन ऐकू लागलो तेव्हा मला कळलं की, मायक्रोफोनच्या शक्तीचा अत्यंत प्रभावी प्रयोग करत तंत्र आणि भाव यांचा जो काय बेमिसाल प्रत्यय आपल्या गाण्यातून त्या देतात, तो अकल्पनीय आहे! त्यांचं शब्दांच्या उच्चारणातील अद्भुत कौशल्य, श्वासाचा अप्रतिम वापर (जो त्या गाताना कधी आणि कुठे घेतात, हे आजवर त्यांच्या गाण्यात कधीच कळलेलं नाही!), त्यांचं लयीचं तत्त्व, अंदाज आणि भान, त्यांचा विशुद्ध सूर आणि कुठलाच अटकाव नसलेला पार्‍यासारखा फिरणारा गळा, संगीतकाराच्या कथनातून त्याची शैली नेमकी टिपत त्या गाण्यातून तिचा तंतोतंत प्रत्यय देण्याचं अद्वितीय सामर्थ्य.. आणि हे सगळं श्रोत्यांना ऐकताना अगदी सहज, सोप्पं आणि स्वाभाविक वाटावं अशी पेशकारी..

खरं तर लताबाईंचा स्वर म्हणजे ईश्वरीय अनुभूतीच! कवयित्री शांताबाई शेळक्यांनी आपल्या एका कवितेत म्हणूनच ठेवलंय..
'ईश्वराचे आम्हा देणे.. तुझे गाणे
आसमंती भरून आहे.. तुझे गाणे'
(संपादित)

आनंद मोडक
सौजन्य- दै. लोकसत्ता (५ मे, २०१३)
(Referenced page was accessed on 21 May 2015)

  इतर संदर्भ लेख

 

Random song suggestion
  चंद्रकांत काळे, रवींद्र साठे