A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्या तरूतळी विसरले गीत

त्या तरूतळी विसरले गीत
हृदय रिकामे घेउनि फिरतो, इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना
स्वरांतुनी चमकते वेदना
तप्त रणे तुडवीत हिंडतो, ती छाया आठवीत

विशाल तरू तरि फांदी लवली
थंडगार घनगर्द सावली
मनिची अस्फुट स्मिते झळकती, तसे कवडसे तीत

मदालसा तरूवरी रेलुनी
वाट बघे सखी अधीर लोचनी
पानजाळि सळसळे, वळे ती मथित हृदय कवळीत

पदर ढळे, कचपाश भुरभुरे
नव्या उभारित ऊर थरथरे
अधरी अमृत उतू जाय परि पदरी हृदय व्यथीत

उभी उभी ती तरूतळि शिणली
भ्रमणी मम तनु थकली गळली
एक गीत परि चरण विखुरले, द्विधा हृदय-संगीत
गीत - वा. रा. कान्‍त
संगीत - यशवंत देव
स्वर- सुधीर फडके
राग - चंद्रकंस
गीत प्रकार - भावगीत
कच - केस.
पाश - जाळे.
मथणे - मंथन करणे, घुसळणे.
मदालसा - सुंदरी.