A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या व्याकुळ संध्यासमयीं

या व्याकुळ संध्यासमयीं
शब्दांचा जीव वितळतो.
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें..
मी अपुले हात उजळतो.

तू आठवणींतुन माझ्या
कधिं रंगित वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधिं असते माझ्यापाशीं..

पदराला बांधुन स्वप्‍नें
तू एकट संध्यासमयीं,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन घेई..

तूं मला कुशीला घ्यावें
अंधार हळू ढवळावा..
संन्यस्त सुखाच्या कांठीं
वळिवाचा पाऊस यावा !
गीत - ग्रेस
संगीत - नरेंद्र भिडे
स्वर- हृषिकेश रानडे
गीत प्रकार - भावगीत, नयनांच्या कोंदणी
  
टीप -
• पुणे आकाशवाणी नभोमालिका 'आनंदलोक' मधील पद.