A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उद्धवा अजब तुझे सरकार

उद्धवा, अजब तुझे सरकार!
लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार!

इथे फुलांना मरण जन्मता
दगडाला पण चिरंजीविता
बोरिबाभळी उगाच जगती चंदनमाथि कुठार!

लबाड जोडिति इमले माड्या
गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार!

वाइट तितुके इथे पोसले
भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार!
इमला - घर.
उद्धव (ऊधो) - वसुदेवाचा पुतण्या, कृष्णसखा.
कुठार - कुर्‍हाड.