A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

या इथे जाहला संगम दो सरितांचा
प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी

दुर्दैवे आपण दुरावलो या देही
सहवास संपता, डागळले ऋण तेही
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी
गीत - वसंत कानेटकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार- रामदास कामत
शौनक अभिषेकी
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - मत्स्यगंधा
राग - मिश्र खमाज, मांड
गीत प्रकार - नाट्यसंगीत
सरिता - नदी.
तशी मत्स्यगंधेची कथावस्तू मराठी नाट्यसृष्टीला नवीन नाही. मराठी रंगभूमीच्या वैभवाच्या काळात कै. य. ना. टिपणीसांचे 'संगीत मत्स्यगंधा' नाटक गाजून गेले आहे. तरी देखील या कथाभागाने माझ्या मनाची पकड का घेतली याची कारणे, ही दोन्ही नाटके तुलनात्मकदृष्ट्या वाचणार्‍या कोणाही रसिकास सहज उमजू शकतील.

महाभारताच्या आदिपर्वात महर्षी व्यासांनी रंगवलेली 'मत्स्यगंधा' मुळातच उत्कट काव्याला, प्रखर नाट्याला आणि मूलभूत जीवनमूल्यांना आवाहन करणारी आहे. सम्राट शंतनू आणि युवराज देवव्रत यांच्या चौकटीतच आजवर ही 'मत्स्यगंधा' सर्वसामान्य वाचकांनी न्याहाळली आहे. पण मत्स्य्गंधेच्या जीवनकहाणीला प्रारंभी पराशर आणि अखेरीस अंबा, अंबिका, अंबालिका यांची जोड दिल्यानेच तिचे चित्र पुरे होऊ शकते. किंबहुना या संपूर्ण संदर्भातच युवराज देवव्रताचे आणि उत्तरार्धातील पितामह राजर्षी भीष्माचे उच्चार आणि आचार स्पष्टपणे उलगडले जातात. या नाटकाच्या एकूण बांधणीतच सम्राट शंतनूला गौणस्थान येणे त्यामुळेच क्रमप्राप्त झाले आहे. हे नाटक लिहून मी हातावेगळे केले असले तरी त्यातील विषय संपला आहे असे मला वाटत नाही. ही विशेषत: अखेरच्या अंकातील राजकन्या अंबेने माझ्या अंत:करणांत खोलवर घर केले आहे. 'मत्स्यगंधा' संपवितानाच राजकन्या अंबेच्या जगावेगळ्या प्रणयाची आणि सूडाची कहाणी सांगणारे, शरपंजरी पडलेल्या भीष्माची व्यथा आणि वैफल्य रंगविणारे 'शिखंडी' हे नाटक कधीकाळी लिहिण्याचा मी माझ्या मनाशी संकल्प सोडला आहे.

मत्स्यगंधेचा कथाभाग बव्हंशी मी महाभारतातून उचलला असला तरी त्यातील अन्वयार्थाची जबाबदारी अर्थातच माझी आहे.

मराठी रंगभूमीवरील संगीताबद्दल या पूर्वी फार लिहिले गेले आहे. 'संगीताने रंगभूमी मारली' ही हाकाटी ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. पण संगीत नाटकांचे जे अवशिष्ट रूप मी न्याहाळले त्यामुळे माझ्या मनात नाट्यसंगीताबद्दल पराकाष्ठेची प्रीतीच उपजली आहे. संगीत नाटक लिहिण्याचे माझे फारा दिवसांचे एक स्वप्‍न या नाटकाने सफल होत आहे, याचा मला आनंद वाटतो. माझ्या 'मत्स्यगंधेने' संगीताबाबतच नव्हे तर एकूण रंग, रूप आणि आकार याबाबतीत जुन्या अभिजात संस्कृत आणि मराठी नाटकांचा वारसा स्वीकारला आहे. हा वारसा पत्करून मी त्यात नव्या प्रयोगांची भर घातली आहे की नाही हे रसिकांनी ठरवायचे आहे.
(संपादित)

वसंत कानेटकर
'मत्स्यगंधा' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

  रामदास कामत
  शौनक अभिषेकी