A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उल्हासाचे रंग भरले

उल्हासाचे रंग भरले नभांतरी दशदिशांतरी

नवकिरणांचे दूत निघाले पूर्व दिशेहुन नाचत नाचत
नवीन गाणी ओठावरती किलबिलते पक्ष्यांची पंगत
सोनेरी स्वप्‍नांची झालर पहाटवार्‍यावरती विहरत
नवी चेतना भरून घ्यावी ज्याने त्याने हृदयागारी

दुथडी भरुनी प्रकाशगंगा गिरिराजीतुन येते आहे
उज्‍जवलतेचा कलश उरावर मिरवित मिरवित येते आहे
हळू हळू तिमिराची वाळू अपुल्या उदरी गिळते आहे
न्‍हातिल पाने हिरवी राने, न्‍हाउन घेतिल कडेकपारी

मतभेदांच्या पाडुन भिंती प्रेमाचे घर उभे करूया
स्‍नेहसुमांच्या गुंफुन माळा हृदयाची दारे सजवूया
मनामनांच्या तारा जुळतिल, विश्वासाची गाणी फुलतिल
सहयोगाची ध्वजा फडकता प्रगतीची वाजेल तुतारी
आगर - शेत, मळा.
कपार - खबदड.
गिरी - पर्वत, डोंगर.
सुम - फूल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.