A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वद जाउं कुणाला शरण

वद जाउं कुणाला शरण करी जो हरण संकटाचें ।
मी धरिन चरण त्याचे । अग सखये ॥

बहु आप्त बंधु बांधवां प्रार्थिलें कथुनि दुःख मनिंचें ।
तें विफल होय साचें । अग सखये ॥

मम तात जननि मात्र तीं बघुनि कष्टती हाल ईचे ।
न चालेचि कांहिं त्यांचें । अग सखये ॥

जे कर जोडुनि मजपुढें नाचले थवे यादवांचे ।
प्रतिकूल होति साचे । अग सखये ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- बालगंधर्व
सवाई गंधर्व
मधुवंती दांडेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सौभद्र
राग - जोगिया
चाल-जो चिदानंदकंद
गीत प्रकार - नाट्यसंगीत
साच - खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज.
दोन-तीन वर्षांपूर्वीं कांहीं एक कारणानें ह्या संगीताची कल्पना माझ्या मनांत उद्भवून तद्नुसार श्रीमहाकवि कालिदास यांच्या अभिज्ञान शाकुन्तलाच्या चार अंकांचें भाषांतर संगीतांत केलें व त्यास योग्य अशी मंडळी अनुकूल झाल्यानें त्याचा रंगभूमीवर प्रयोगही करून दाखविला; तो रसिकजनांस मान्य झाला असें वाटल्यावरून दुसरे वर्षीं त्या नाटकाच्या पुढच्या तीन अंकांचेंही भाषांतर करून, तो ग्रंथ संपवून सर्व प्रयोग आमच्या मित्रमंडळींच्या दृष्टीसमोर आणला.

आतां या तिसर्‍या वर्षी आमच्या आर्यबंधूंची सेवा करण्यास कोणतें साधन मिळवावें या विवंचनेंत असतां दुसरीं प्राचीन नाटकें पुष्कळ पुढें येऊन उभीं राहिलीं. परंतु आपल्यापाशीं अनुकूल असलेल्या मंडळीकडे पहातां तीं सर्व नाटकें माझ्या दृष्टीनें असाध्यशीं वाटूं लागलीं. या कारणामुळें आपल्या पुराणांतील एखादा इतिहास घेऊन त्यावर स्वकपोलकल्पित नाटकाची रचना करून हें वर्ष साजरें करावें, असा विचार मनांत ठसला. नंतर तसे इतिहास पुष्कळ मनांत येऊन हा अर्जुन-सुभद्राविवाहाचा इतिहास सर्व प्रकारें ठीकसा वाटल्यानें यथामति त्यास नाटकरूप देऊन हें 'संगीत सौभद्र' नाटक तयार केलें.

नाटकाचे निबंध पुष्कळ आहेत; तिकडे जितकें देववेल तितकें लक्ष देऊन याची रचना केली आहे. किती एक ठिकाणीं इंग्लिश पद्धतीवरही यांत रस आले आहेत. सारांश, हें नाटक स्वतंत्र रीतीनें तयार न होता अनुकूल असलेल्या मंडळीकडे पाहून रचिलें असल्यामुळें सुज्ञ रसिक यांतील दोषांकडे दृष्टि न देतां, अल्प गुणांचा बहुमान करतील अशी आशा करतों.
(संपादित)

अण्णासाहेब किर्लोस्कर
'संगीत सौभद्र' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अनंत विनायक पटवर्धन (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  बालगंधर्व
  सवाई गंधर्व
  मधुवंती दांडेकर