A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वहिनी माझी हसली ग

वहिनी माझी हसली ग वहिनी माझी हसली
आजवरी जी दादावरती उगाच होती रुसली

वहिनी हसता कणकण हासे
भवती सांडले सोनकवडसे
घरदाराला फुटले हासू नवीन शोभा दिसली

वहिनी हसता हसले अंगण
अंगणातले अन्‌ वृंदावन
वहिनी पाणी घालू लागता तुळस कशी रसरसली

वहिनी हसता हसले घुसळण
ताकावर ये लोणी उसळुन
खुदुखुदु हसतो भात चुलीवर उकळी फुटली कसली?

हासत हासत पदर बांधुनी
भरभर कामे करते वहिनी
तो शकुनाचा हात लागता घरी लक्षुमी दिसली

हसू वहिनीच्या गाली दिसता
दादा हसला वहिनी हसता
हरवुन गेली होती गंमत फिरुनी आज गवसली
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - राम कदम
स्वर- सुमन कल्याणपूर
चित्रपट - भाग्यलक्ष्मी
गीत प्रकार - चित्रगीत
कवडसा - आडोश्याच्या आडून येणारी उन्हाची तिरीप.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.