A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वनवास हा सुखाचा

वनवास हा सुखाचा
दिनरात लाभताहे सहवास राघवाचा

हाते उभारलेली ही रम्य पर्णशाला
छायेत नांदता या आनंद ये निराळा
भूमीवरी जणू हा संसार पाखरांचा

खांबास चार वेळू, शाकारणी तृणांची
कानी सुरेल वाणी माझ्याच कंकणांची
कष्टे कमावलेला हो आस्वाद अमृताचा

हे सौख्य काय देती साकेत राजधानी?
प्रीतीरसात न्हाती सुखदुःख भाव दोन्ही
प्रीती मिळो पतीची हा स्वर्ग स्वामिनीचा
वेळू - बांबू.
शाकारणी - छपराची दुरुस्ती.
साकेत - अयोध्या.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.