A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वाटेवर काटे वेचीत चाललो

वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलांत चाललो

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरुनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादातच शीळ वाजवीत चाललो

चुकली तालात चाल, लागला जिवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो

खांद्यावर बाळगिले ओझे सुखदुःखाचे
फेकुन देऊन अता परत चाललो
गीत - कवी अनिल
संगीत - यशवंत देव
स्वर- पं. वसंतराव देशपांडे
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- २० मार्च १९७२, दिल्ली-नागपूर प्रवास.
महाराष्ट्रात भावगीतांचा प्रसार घरोघरी झाला तो विशेषतः ग्रामोफोन रेकॉर्डस्‌च्या आणि रेडिओच्या माध्यमातून. याशिवाय भावगीत गायकांच्या मैफिलींतूनही श्रोत्यांनी गर्दी करून भावगीतांना उदार आश्रय दिला.

ग्रामोफोन कंपनीमार्फत जी गाणी समाजात आली ती एका विकाऊ मालाच्या स्वरूपात. भावगीताची एखादी रेकॉर्ड काढण्यामागे कंपनीची एकच दृष्टी होती. 'ही रेकॉर्ड विकली गेली पाहिजे !' आणि विकाऊपणात श्रेष्ठ असलेला सर्वच माल काही कलेचा आदर्श म्हणून म्हणता येणार नाही. म्हणूनच भावगीताच्या प्रांतात जे गायक, कवी आणि संगीत-दिग्दर्शक इतकी वर्षे काम करीत आहेत, ते सर्वच काही जनतेसमोर आले आहेत, असे म्हणता येणार नाही. त्या सर्वांचे अनेक प्रयोग अजून अंधारात असतील. त्यांना जनतेसमोर येण्यासाठी योग्य ते सूत्र, योग्य ती वाट मिळाली नसेल. कारण रेकॉर्डस्‌च्या माध्यमात यशस्वी व्हायचे, म्हणजे आपली कला नक्कीच विकली जाईल, अशी रेकॉर्ड-कंपनीची खात्री प्रथम करून देणे आवश्यक. लोकांना फडकत्या चाली आवडतात, मग तशा चाली लावणे सुरू करायला हवे. तसेच झटकन समजणार्‍या सोप्या (क्वचित सवंगही चालतील !) अशा काव्यरचना निवडायला हव्यात आणि एखादा लोकप्रिय गायक किंवा गायिका निवडायला हवी. इतके झाले म्हणजे विक्रीला योग्य असे गाणे तयार होते, असे सर्वसाधारण गणित !

आजपर्यंत ग्रामोफोनच्या तबकडीवर आलेली बहुतेक गाणी त्यांची विक्री- क्षमता पाहूनच आणली गेली.

भावगीताच्या प्रांतात आमची यापुढे काही प्रगती व्हायची म्हणजे काय व्हायचे? आम्ही अधिकाधिक 'विक्रीयोग्य' भावगीते तयार करण्यात तरबेज व्हायचे? बस्स?

अशाने आमची भावगीत परंपरा खर्‍या अर्थाने जोपासली जाईल का? तिला खत-पाणी मिळेल का? मला वाटते की, नाही.

एखाद्याने काही नवीन कल्पना संगीत-दिग्दर्शनाच्या क्षेत्रात मांडली, काही नवीन धाडस करतो म्हटले, तर त्याचे प्रयोग तो कुठे करणार? कोणासमोर करणार? कोण त्याचे नवीन प्रयोग ऐकणार? एखाद्या नवीन गायकाला बाजारपेठेत स्थान नाही. अभिजात काव्यप्रकाराला तबकडीवर स्थान जवळ जवळ नाहीच; मग या सर्वांच्या प्रायोगिकतेला गुदमरवून टाकायचे का? त्यांना वाव मिळायला कोणता मंच आपल्याकडे आहे?

असा मंच आकाशवाणी निर्माण करू शकते. आकाशवाणीवरील गायक गायिकांच्या यादीमध्ये अशी कितीतरी नावे आढळतील की ज्यांची गाणी लोकांनाही आवडतात. (मग त्या गायकांची ध्वनिमुद्रिका बाजारात निघाली असो वा नसो.) तिथे चालीसंबंधी अनेक प्रयोग करण्याची संधी संगीत-दिग्दर्शकांना मिळू शकेल. योग्य मार्गदर्शनाखाली कवींनाही उत्तम गेय रचना करता येतील. त्या ठिकाणी विक्रीची दृष्टी नसल्यामुळे मोकळेपणाने हवी तशी निर्मिती करण्यास त्यांना वाव मिळेल. भावगीत निर्मितीमध्ये अनेक नवीन प्रवाह येऊ लागतील. या दालनाचा विस्तार सर्वांगांनी होण्यास मदत होईल. अधिकाधिक व्यक्तींचे श्रम आणि कलाकौशल्य या कामात मिळण्याची सोय होईल.

योग्य ते वातावरण आणि योग्य त्या तांत्रिक सोयी आणि पैसा उपलब्ध असल्यास आकाशवाणीचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जाऊ शकेल.

कवी, संगीत-दिग्दर्शक आणि गायक या सर्वांनी मिळून सुगम संगीताच्या परंपरेला निकोप ठेवायचे आहे आणि विकसित करावयाचे आहे.

रागदारी संगीतात स्वरप्राधान्य किंवा स्वरप्राबल्य दिसते. सुगम संगीताचा पाया जर 'शब्द' असेल तर या शब्दाकडे अधिक काळजीपूर्वक पाहिले गेले पाहिजे. वाद्यमेळासारख्या बाकीच्या गोष्टी (ऑर्केस्ट्रा) सुमधुर आणि आनंददायी हव्यातच. परंतु सुगम संगीताच्या शब्दप्रधान चौकटीमध्ये खुद्द शब्दांनाच बसायला जागा नाही, अशी स्थिती असू नये.

एखाद्या कवीने स्वतःच आपल्या भल्याबुर्‍या आवाजात म्हटलेली कविता श्रोत्यांना आवडते. श्रोत्यांवर त्या कवितेचा फार परिणाम होतो. मात्र तीच कविता सुरेल वाद्यमेळामध्ये ऐकली, तर कधी कधी योग्य ती भावनिर्मिती करीत नाही. ती कविता ऐकणारा कवितेभोवतालच्या वाद्यांच्या कसरतीनेच गुंग होऊन जातो. अशा प्रकारे, ऐकणारा हा शब्दार्थाला, भावार्थाला आणि त्यापासून मिळणार्‍या आनंदाला पारखा होतो. साहित्य आणि श्रोता यांना जवळ आणायचे सोडून त्यांची फारकत करणारी, श्रोत्यांचे लक्ष आपल्याकडेच खेचून ठेवणारी ही वाद्ये, ललित संगीताच्या क्षेत्रात कधी कधी नको तो धुमाकूळ घालताना दिसतात.

तीन मिनिटांच्या ध्वनिमुद्रिकेत अधिकांश जागा वाद्यमेळाने व्यापलेली, राहिलेल्या जागेत शब्द कसेतरी नाद दुमडून बसलेले, मुख्य घटक जे 'शब्द' त्यांचा गळाच मुळी सुरांनी आणि वाद्यमेळांनी आवळून टाकलेला- ही परिस्थिती काही निरोगी नव्हे.

साहित्याधिष्ठित अशा भावसंगीताला वाद्यांच्या साहाय्याने आपले अस्तित्व टिकवण्याची वेळ येण्याचे कारण नाही. तशी वेळ आली असेल तर साहित्याचा कस वाढला पाहिजे. साहित्य समजून त्याचा आदर करणारे संगीत-दिग्दर्शक आणि गायक बहुसंख्येने तयार झाले पाहिजेत. वाद्यमेळाचे तंत्र माहिती असणे आवश्यक आहे. परंतु वाद्यमेळाचा वापर हा साहित्याला, कवितेला झेपेल इतपत केला जावा. वाद्यमेळाचे किंवा तंत्रज्ञानाचे अवास्तव प्रदर्शन करण्याच्या हव्यासात चांगले साहित्य दाबले जाते, झाकले जाते आणि मग 'साहित्य कसेही असले तरी चालेल, आकर्षक वाद्यमेळावर सर्वच गीत आकर्षक करू' या कल्पनेने जेव्हा काम होते, तेव्हा त्या ठिकाणी खर्‍या भावसंगीताची प्रामाणिक निर्मिती होत नाही.

आपल्या आधुनिक संगीतात पाश्चात्त्य संगीताची लाट आली आहे. त्यांच्या पद्धतीचे स्वरमेळ आपल्या कवितांवर रचले जाऊ लागले आहेत. हे सर्व प्रयत्‍न प्रयोग म्हणून करायला काहीच हरकत नाही. परंतु असे प्रयत्‍न सफल झाले की विफल, हे मूळ हेतूच्या संदर्भात तपासले गेले पाहिजे आणि या नवीन प्रयत्‍नांना योग्य ते वळण लावले गेले पाहिजे.

एखाद्या ध्वनिमद्रिकेत विशिष्ट वाद्यांचा उपयोग करण्याची किंवा वाद्यांवर काही नवीन सुरावट दाखवण्याची इच्छा एखाद्या संगीत-दिग्दर्शकाला झाली असेल; सुरांची एखादी नवीन बंदिश त्याला सुचली असेल, तर त्याने त्यासाठी कवीला पाचारण करून त्याच्याकडून आपल्याला हवे तसे गीत नव्याने लिहून घ्यावे. तसे न करता एखाद्या जुन्या काव्यरचनेवर हट्टाने आपल्या कल्पनेप्रमाणे स्वरसाज चढवण्याचा प्रयत्‍न केला, तर तो नीट जमणार नाही. त्यात कवीला योग्य तो न्याय मिळणार ​नाही.

नवीन नवीन प्रयोग करताना साहित्य, स्वरमेळ आणि वाद्यमेळ यांची परस्परांना पोषक अशीच आकृती कशी निघेल याची काळजी घेतली गेली पाहिजे. पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे अंगावर झेलताना भारतीय परंपरेतली उपयोगी तत्त्वे आपल्यापासून दूर जाणार नाहीत, ही काळजी जशी समाजाने घ्यायची, त्याचप्रमाणे कुठल्या विदेशी संगीताच्या लाटेवर स्वार होऊन दिमाखाने विहार करीत असताना, आपल्या भावसंगीताची नौका जीवघेण्या भोवर्‍यात तर सापडत नाही ना, हेही पाहिलेच पाहिजे. तरच शब्दप्रधान गायकी ललित संगीताच्या हेतूशी प्रामाणिक राहील आणि उत्तरोत्तर विकास करील.
(संपादित)

यशवंत देव
शब्दप्रधान गायकी
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.