वंद्य 'वंदे मातरम्'
माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र 'वंदे मातरम्'
याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले
शस्त्रहीना एक लाभे शस्त्र 'वंदे मातरम्'
निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत 'वंदे मातरम्' !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | वंदे मातरम् |
गीत प्रकार | - | चित्रगीत, स्फूर्ती गीत |
आहुती | - | यज्ञात अर्पण करावयाचे हवन द्रव्य, बलिदान. |
मला वाटतं १९४८ च्या डिसेंबरच्या सुमारास मी एका नवीन क्षेत्रात काम करायला पुण्याला गेलो. फडके नव्या पेठेत, '१७ सदाशिव' ह्या लेल्यांच्या वाड्यात राहत होते. पहिल्या मजल्यावर दोन खोल्या त्यांनी भाड्याने घेतल्या होत्या. एक छोटं स्वयंपाकघर आणि एक बसण्याउठण्याची खोली. तीही तशी फार मोठी नाही. वर पत्रा. माझा मुक्काम फडके यांचेकडेच असे.
अजून गदिमांचं तो चित्रपट लिहिणं पक्कं झालं नव्हतं. ते भेटतच नव्हते. दुसरे दिवशी ते पुण्याला येणार होते मुंबईहून, काही करून त्यांना गाठणं प्राप्त होतं. गाडीतून उत्तरल्या उतरल्या त्यांना गाठावं म्हणून आम्ही तिघे, बाबूजी, मी, राम गबाले गेलो. गबाले चित्र दिग्दर्शित करणार होते. माडगूळकर, बाबूजी, गबाले ही मंडळी कोल्हापूरची. त्यांचे संबंधही घनिष्ठ होते. माडगूळकरांना मिळवण्याकरता त्यांनी कंबर कसली होती. पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडायला तीन दरवाजे होते. आम्ही तिघे एकेका दरवाजावर उभे राहिलो. आता माडगूळकर हातातून निसटणं शक्य नव्हतं.
प्रोड्यूसरशी बोलणी चर्चा होऊन चित्रपट निर्मितीच्या सगळ्या बाबी निश्चित झाल्या. चित्रपटाचं नाव होतं 'वंदे मातरम्.' माडगूळकर लेखक, गीतकार; बाबूजी संगीत; राम गबाले दिग्दर्शक, प्रमुख भूमिका पु. ल. देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीताबाई असा मेळ होता.
काम सुरू झालं. माझ्या या पुण्यातल्या वास्तव्यातले काही अनुभव फार गमतीशीर आहेत.
बाबूजी, त्यांच्या वहिनी सगळीच माणसं आतिथ्यशील. त्यामुळे त्या '१७सदाशिव' मधल्या फडक्यांच्या घरी बरीच गर्दी असायची. मी तर असेच, पण माडगूळकर, अमर वर्मा, गबाले यांचंही अधूनमधून वास्तव्य असे.
अमर वर्मा त्यावेळी प्रभातमध्ये लेखक म्हणून रुजू झाले होते. बाबूजी तिथे काम करीत. त्यामुळे त्यांची ओळख. ह्याच अमर वर्माशी पुढे माणिक दादरकर या प्रख्यात गायिकेचा विवाह झाला.
'वंदे मातरम्' पूर्ण झाला. बरा चालला. त्या चित्रपटातल्या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्' आणि 'अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी' ही दोन गाणी खूप गाजली. माझं नाव पडद्यावर सहायक संगीत दिग्दर्शक म्हणून दिसलं. बरं वाटलं.
(संपादित)
राम फाटक
'माझी स्वरयात्रा' या राम फाटक लिखित पुस्तकातून.
सौजन्य- राजहंस प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.