A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं

वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥

येणें सुखें रुचे एकान्‍ताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥२॥

आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥

कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ॥४॥

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥

तुका ह्मणे होय मनासी संवाद ।
आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥
गीत - संत तुकाराम
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- लता मंगेशकर
राग - भैरवी
गीत प्रकार - संतवाणी
कंथा - जुन्या फाटक्या कपड्यांपासून केलेले पांघरण्याचे वस्‍त्र, गोधडी.
कमंडलु - संन्याशाचे पाण्याचे भांडे.
परवडी - प्रकार.
वल्लरी - वेल (वल्ली, वल्लिका).
भावार्थ-

  • या वनामध्ये असणार्‍या निरनिराळ्या प्रकारच्या वृक्ष आणि वेली, येथे राहणारे प्राणी, आपल्या गोड आवाजाने देवाला हाक मारणारे पक्षी, हे सर्व आमचे सोयरे झाले आहेत.
  • यांच्या सानिध्यामुळे येथील एकान्‍तवास फार सुखकारक झाला आहे. येथे कुठलाही गुणदोष अंगाला लागत नाही.
  • पृथ्वी हे राहण्याचे स्थान असून डोक्यावर असणारे आकाश मंडपाप्रमाणे आहे. आमचे मन रमेल, प्रसन्‍न राहील तेथेच आम्ही खेळत राहू.
  • देहाच्या उपचाराकरिता जाडाभरडा कपडा आणि पाण्यासाठी कमंडलू या गोष्टी भरपूर वाटतात. वेळ किती होऊन गेला हे वारा सांगतो.
  • येथे असणार्‍या भोजनाला हरिकथा आहे. आम्ही तिचे निरनिराळे प्रकार करून ते रुचकर पदार्थ आवडीने सेवन करतो.
  • तुकाराम महाराज म्हणतात, अशा एकान्‍तात माझा माझ्या मानाशी संवाद होत असतो. प्रश्‍न आपणच विचारून आपणच त्याचे उत्तर द्यावे, अशा तर्‍हेचा वादविवाद चालतो.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.