A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या बालांनो या रे या

या बालांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

मजा करा रे ! मजा करा !
आज दिवस तुमचा समजा.

स्वस्थ बसे
तोचि फसे;
नवभूमी
दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया.

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहूबाजु भरे,
जिकडेतिकडे फुलें फळें,
सुवास पसरे, रसहि गळे.

पर ज्यांचे
सोन्याचे
ते रावे
हेरावे
तर मग कामें टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया !

पंख पाचुचे मोरांना,
टिपति पाखरें मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना,
मौज दिसे ही थोड्यांना.

चपलगती
हरिण किती !
देखावे
देखावे
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया !
गीत - भा. रा. तांबे
संगीत - वसंत देसाई
स्वर- फैयाज, प्रभाकर, कैलासनाथ जैस्वाल
गीत प्रकार - बालगीत
  
टीप -
• काव्य रचना- (प्रथमलेखन) १८९४, देवास (पुनर्लेखन) १९०१, इंदूर.
पर - श्रेष्ठ, नंतरचा / पंख.
पाचू (पाच) - एक प्रकारचे रत्‍न.
रावा - पोपट.
पृथक्‌
'पुंगीवाला' हे छोटेखानी काव्य प्रख्यात आंग्लकवी Robert Browning यांच्या Pied Piper चे रूपांतर आहे. १८९४ साली भा. रा. तांबे यांनी देवासचे राजपुत्र श्रीमंत खासेराव पवार यांचे शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांस काव्याची अभिरुची लागावी म्हणून लिहिले.

'पुंगीवाला' या काव्यशृंखलेतून हे गीत अनेक क्रमिक पुस्तकांतून सुटंच घेतलं गेल्यामुळे एक स्वतंत्र कविता म्हणून वाचकांच्या परिचयाचं झालं आहे.

मूळातील 'या बालांनो' ऐवजी 'या बाळांनो' आणि 'वनभूमी' ऐवजी 'नवभूमी' असे उल्लेख पाठ्यपुस्तकांतून आढळतात.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  फैयाज, प्रभाकर, कैलासनाथ जैस्वाल