A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या धुंद चांदण्यात तूं

या धुंद चांदण्यात तूं संगती हवास
होईल रे सुखाचा तुजसंगती प्रवास

नौकेमधें बसावे मृदु चांदणे हसावे
मी भावगीत गावे तू त्यात मोहरावे
'मी-तू'पणा विरावा, जावे सरून भास
होईल रे सुखाचा तुजसंगती प्रवास

व्हावास चंद्रमा तू मी रोहिणी बनावे
त्या चंद्र-रोहिणीला चिडवूनिया हसावे
व्हावा अपूर्व अपुल्या मधुप्रीतिचा विलास
होईल रे सुखाचा तुजसंगती प्रवास

वायू असा खट्याळ सांगे जगास गुज
या चांदण्या तशाच हसती त्यजून लाज
मी लाजरी लता रे आधार तूं जिवास
होईल रे सुखाचा तुजसंगती प्रवास
गीत - कवी सुधांशु
संगीत - गजानन वाटवे
स्वर-
गीत प्रकार - शब्दशारदेचे चांदणे, भावगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.