याचका थांबु नको
याचका, थांबु नको दारांत
घननीळांची मूर्त वीज मी, नकोस जाळूं हात
कामव्यथेची सुरा प्राशुनी
नकोस झिंगूं वृथा अंगणी
जनकसुतेचा नखस्पर्शही अशक्य तुज स्वप्नांत
मी न एकटी, माझ्याभंवती
रामकीर्तिच्या दिव्य आकृती
दिसल्यावांचुन तुला धाडतील देहासह नरकांत
जंबुकस्वरसें कसलें हंससी?
टक लावुन कां ऐसा बघसी?
रामावांचुन अन्य न काहीं दिसेल या नयनांत
या सीतेची प्रीत इच्छिसी
कालकुटांतुन क्षेम वांच्छिसी
चंद्रसूर्य कां धरूं पाहसी हतभाग्या हातांत?
वनीं निर्जनीं मला पाहुनी
नेउं पाहसी बलें उचलुनी
प्रदीप्त ज्वाला बांधुन नेसी मूढा, कां वसनांत?
निकषोपल निज नयनां गणसी
वर खड्गासी धार लाविसी
अंधपणासह यात आंधळ्यां, वसे तुझ्या प्राणांत
कुठें क्षुद्र तूं, कोठें रघुवर
कोठें ओहळ, कोठें सागर
विषसदृश तूं, रामचंद्र ते अमृत रे साक्षात
कुठें गरुड तो, कुठें कावळा
देवेंद्रच तो राम सांवळा
इंद्राणीची अभिलाषा कां धरिती मर्त्य मनात?
मज अबलेला दावुनिया बल
सरसाविसि कर जर हे दुर्बल
श्रीरामाचे बाण तुझ्यावर करितील वज्राघात
सरशि कशाला पुढती पुढती?
पाप्या, बघ तव चरणहि अडती
चरणांइतुकी सावधानता नाहीं तव माथ्यांत
धांवा धांवा नाथ रघुवर !
गजशुंडा ये कमलकळीवर
असाल तेथुन ऐका माझा शेवटचा आकांत
घननीळांची मूर्त वीज मी, नकोस जाळूं हात
कामव्यथेची सुरा प्राशुनी
नकोस झिंगूं वृथा अंगणी
जनकसुतेचा नखस्पर्शही अशक्य तुज स्वप्नांत
मी न एकटी, माझ्याभंवती
रामकीर्तिच्या दिव्य आकृती
दिसल्यावांचुन तुला धाडतील देहासह नरकांत
जंबुकस्वरसें कसलें हंससी?
टक लावुन कां ऐसा बघसी?
रामावांचुन अन्य न काहीं दिसेल या नयनांत
या सीतेची प्रीत इच्छिसी
कालकुटांतुन क्षेम वांच्छिसी
चंद्रसूर्य कां धरूं पाहसी हतभाग्या हातांत?
वनीं निर्जनीं मला पाहुनी
नेउं पाहसी बलें उचलुनी
प्रदीप्त ज्वाला बांधुन नेसी मूढा, कां वसनांत?
निकषोपल निज नयनां गणसी
वर खड्गासी धार लाविसी
अंधपणासह यात आंधळ्यां, वसे तुझ्या प्राणांत
कुठें क्षुद्र तूं, कोठें रघुवर
कोठें ओहळ, कोठें सागर
विषसदृश तूं, रामचंद्र ते अमृत रे साक्षात
कुठें गरुड तो, कुठें कावळा
देवेंद्रच तो राम सांवळा
इंद्राणीची अभिलाषा कां धरिती मर्त्य मनात?
मज अबलेला दावुनिया बल
सरसाविसि कर जर हे दुर्बल
श्रीरामाचे बाण तुझ्यावर करितील वज्राघात
सरशि कशाला पुढती पुढती?
पाप्या, बघ तव चरणहि अडती
चरणांइतुकी सावधानता नाहीं तव माथ्यांत
धांवा धांवा नाथ रघुवर !
गजशुंडा ये कमलकळीवर
असाल तेथुन ऐका माझा शेवटचा आकांत
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वराविष्कार | - | ∙ सुधीर फडके ∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
राग | - | स्वतंत्र रचना |
गीत प्रकार | - | गीतरामायण, राम निरंजन |
टीप - • गीतरामायण. | ||
• प्रथम प्रसारण दिनांक- २१/१०/१९५५ | ||
• आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- माणिक वर्मा. |
अभिलाष(षा) | - | इच्छा, लालसा / तृष्णा. |
इंद्राणी | - | इंद्र पत्नी- शची. |
क्षेम | - | आलिंगन, गळाभेट. |
कालकूट | - | एक जालीम विष / द्वेषाची भावना. |
जंबूक | - | कोल्हा. |
निकषोपल | - | (निकष + उपल) कसोटी पाहण्याचा दगड. |
प्रदीप्त | - | उज्ज्वल. |
मूढ | - | गोंधळलेला / अजाण. |
वसन | - | वस्त्र. |
वांच्छा | - | इच्छा. |
शुंडा | - | सोंड. |
सुता | - | कन्या. |
सुरा | - | मद्य. |