A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रात्र काळी घागर काळी

रात्र काळी घागर काळी ।
यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥

बुंथ काळी बिलवर काळी ।
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय ॥२॥

मी काळी कांचोळी काळी ।
कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥

एकली पाण्याला नवजाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥

विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥
एकावळी - एकपदरी हार.
काचोळी - मागे बंद असलेली चोळी.
कांस कांसिली - नेसलेले लुगडे / पातळ.
बुंथी - आवरण / पडदा / आच्छादन.
बिलवर - उच्‍च प्रतीची काचेची बांगडी.
प्रसंग कसा नाट्यमय आहे बघा. काळोख्या रात्रीची वेळ निवडून, एक गोपी काळ्या यमुनेवर पाणी भरावयास निघाली. चांगली तयारी करून निघाली. म्हणजे चुंबळ, घागर आहेतच, पण बिलवर, गळ्यातील मोत्यांचा हार, हेही आवर्जून घेतले आहेत. अभिसारिका असल्याने सर्व गोष्टी निवडून काळ्या रंगाच्या घेतल्या. पण तरीही एक राहिलेच. ती स्वत: गोरीच होती. मग, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याप्रमाणे तिने ठणकावून सांगितले, "मी काळी". वाद मिटला. आतां जाण्यास अडचण काय? तीही तीने लगेच सांगितली. "मी भित्री. एकटी कशी काय जाणार? सोबत नको? सखे, त्या सावळ्याला बरोबर धाड ना !"

आपण घरांतल्या लग्‍नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या 'कृष्णा'ला सावळी म्हणून मोकळी ! विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंत नाही. तो साफ सांगतो "माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे.

या पदातली लय लक्षणीय आहे. तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते; रात्र-घागर-यमुना जळ; बुंथ-बिलवर-गळामोती एकावळी; मी-कांचोळी-कांसे कासिली. मस्त जमलय कीं नाही?

शरद
(या लेखकाशी संपर्क साधावयाचा आहे. वाचकांपैकी कुणास माहिती असल्यास alka@aathavanitli-gani.com या पत्त्यावर ईमेल करावे, ही विनंती.)

सौजन्य- उपक्रम (http://mr.upakram.org)(१ जुलै, २००८)
(Referenced page was accessed on 31 July 2016)

 

 

  गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर