A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झू झू झू झू रॉकेट

झू झू झू झू झू झू रॉकेट
चंद्राला देऊया गमतीची भेट
झू झू झू झू झू झू रॉकेट

रॉकेट निघाले झू झू वरती
वार्‍याशी दोस्ती ढगांशी मस्ती
हवेला छेद ढगांना भेद
पृथ्वीच्या वेडाला चंद्राचा वेध

वर वर बघणारी वाकलेली मान
रॉकेटचा आकार होइ लहान लहान
आकाशात फुगली धूराची शेपटी
मागून निघाली बिचारी एकटी

आकाशी पाटीवर खडूची रेघ
सेकंदाला हजार मैल रॉकेटचा वेग
पृथ्वीची तोफ धूराचा गोफ
मोठ्या तू घेतली छोटिशी बुलेट
झू झू झू झू झू झू रॉकेट

दूरवर कोठेही पृथ्वी दिसेना
चांदोबा कोणता तेही कळेना
आकाशात तिथे क्षितीज कक्षा
कक्षेच्या बाहेर गेल्यास भयंकर शिक्षा

आकाशात चार तास न थांबता भटक
नाहीतर शनीच्या कड्यांना लटक
गुरूच्या चंद्राच्या नागमोडी वार्‍या
प्‍लूटोला धरून मार सूर्याला फेर्‍या

दिव्याला घालवा ठाण्याला कळवा
रात्रीचं रॉकेटला जोरानं पळवा
घड्याळात पाचाचा लावावा गजर
सहाला आंघोळी आटपल्या तर
साताला भेटूया चंद्रावर थेट
झू झू झू झू झू झू रॉकेट

रोबोट म्हणाला चला चहा प्या
पाठीवर ऑक्‍सिजनची नळकांडी घ्या
चंद्रावर जोरजोरात नका मारू हाका
चालताना छोटीछोटी पावले टाका
चंद्रावर थांबायचा नका करू हट्ट
चला चला चंद्र आला पट्टा करा घट्ट
पृथ्वीचा चंद्राशी होईल समेट
झू झू झू झू झू झू रॉकेट

रॉकेटच्या बाजूच्या शिडीवर चढलो
चंद्रावर खाली उतरायला लागलो
ऊठ ऊठ ऊठ असा आरडाओरडा झाला
जोरजोरात हलल्याचा मला भास झाला
मला वाटलं चंद्रावर धरणीकंप झाला
मागोमाग बाबांचा आवाज कानी आला
इतक्या वेळ चंद्राचं स्‍वप्‍नं बघत होतो
मला काय ठाऊक झोपेमध्ये होतो?
पुन्हा एकदा बांबांचा आवाज कानी आला
अंगातला आळस माझा कुठच्या कुठे गेला
तुम्‍हालाही शाळेत जायला होईल की लेट
झू झू झू झू झू झू रॉकेट

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.