A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज आपुल्या प्रथम प्रीतिचा

आज आपुल्या प्रथम प्रीतिचा संगम हा झाला !
प्रेमफुलांच्या गळ्यात घालुनि हिंडुया माळा

नाचति झाडे, नाचति हो वेली
रानपाखरे वेडी झाली !
पृथ्वीवरती स्वर्ग धरेला भेटाया आला !

पहा कोयना इकडून येई,
समोरून ही कृष्णामाई !
प्रीतिसंगम सखे असा हा जगामध्ये पहिला !
महाराष्ट्राचे आद्य कादंबरीकार हरि नारायण आपटे ह्यांनी 'संगीत संत सखू' हे नाटक १९११ साली लिहिले. त्या नाटकाचा पहिला प्रयोग २६ ऑगस्‍ट १९११ रोजी पुणे येथे झाला. तो अतिशय लोकप्रिय झाला. तेव्हापासून 'सखू' माझ्या डोक्यात शिरून जी बसली ती आतापर्यंत.

पुढे मी स्वत:ची 'अत्रे पिक्चर्स' ही कंपनी मुंबईत स्थापन करून तिचा पहिला चित्रपट 'पायाची दासी' हा हिंदी-मराठी अशा दोन भाषांत काढला. 'संत सखू'तला श्रीविठ्ठल-भक्तीचा सर्व भाग आणि दैवी चमत्कार वजा करून त्यातील केवळ सामाजिक आशयावर 'पायाची दासी' ह्या चित्रपटाची मी उभारणी केली होती. तो चित्रपट लोकप्रिय झाला खरा; पण त्यामुळे माझी 'संत सखू'बद्दलची मूळची ओढ काही कमी झाली नाही. ती इतक्या वर्षांनी साकार करण्याची संधी माझ्या आजाराने मला आणून दिली. माझ्या जवळ जी काही जुनी टाचणे होती, त्यांच्या आधाराने बिछान्यावर पडल्या पडल्या या वर्षाच्या (१९६८), २२ जानेवारी ते २७ जानेवारी या पाच दिवसांत मी हे नाटक लिहून पूर्ण केले.

संत सखू कोणत्या काळी होऊन गेली ह्याचा नक्की ऐतिहासिक पुरावा आढळत नाही. म्हणून तिची कथा काल्पनिक असावी, असे काही इतिहासकारांचे मत असावे. पण तसे म्हणावे तर तिचे नाव नि गोष्ट महाराष्ट्रातल्या आबाल-वृद्धांच्या इतकी परिचयाची आहे की तिच्या अस्तित्वानद्दल संशयसुद्धा कोणाच्या मनात येत नाही. मराठी जानपद वाङ्मयात सखूवर अनेकांनी काव्ये लिहिलेली आहेत.

संत सखूच्या अस्तित्वाचा असा केवळ त्रोटक स्वरूपाचाच वाङ्मयीन पुरावा आहे. कर्‍हाडला कृष्णा-कोयनेच्या संगमाजवळ संत सखूच्या नावाचा एक घाटसुद्धा आहे. तो १७४३ साली अनगळ गोसाव्याने बांधला असे म्हणतात. संत सखू जर केवळ काल्पनिकच असती तर तिच्या नावाने जुन्या काळातल्या लोकांनी असा घाट बांधला नसता. त्या घाटाखाली 'सखूची पायरी' दाखवली जाते, तीच 'सखूची समाधी' असावी, असे म्हणतात.

'संतलीलामृता'त सखूचे ओवीबद्ध चरित्र लिहिणार्‍या महिपतबुवांचा जन्म कविश्रेष्ठ मोरोपंतांच्या आधी चौदा वर्षे नगर जिल्ह्यात झाला. तिसर्‍या पानिपतच्या लढाईनंतर तो एकोणतीस वर्षांनी मरण पावला. त्याच्या जन्मापूर्वी किंवा त्या सुमारास म्हणजे पहिल्या पेशव्यांच्या काळात सखू होऊन गेली असावी आणि तिचे अद्‍भुत चरित्र त्या काळी महाराष्ट्रात सर्वतोमुखी झालेले असावे. सखू ही 'कृष्णातीरी असलेल्या करवीर नगरा'त होऊन गेली, असे महिपतबोवा म्हणतात. पण आजकाल कोल्हापूरचा उल्लेख 'करवीर' या नावाने केला जातो. कदाचित पूर्वीच्या काळी सर्वच दक्षिण भागाला 'करवीर' म्हणत असत किंवा काय माहीत नाही. पण महिपतबुवांच्या काळी कर्‍हाडचे नाव 'कृष्णातीरीचे करवीर' असावे, असे स्पष्ट दिसते.

कर्‍हाडचा प्राचीन इतिहास फार अद्‍भुतरम्य आहे. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या ते दुसर्‍या शतकाच्या शीलालेखांत कर्‍हाडचा उल्लेख आढळतो. त्यावेळी लोखंडाच्या व्यापारासाठी कर्‍हाड हे प्रसिद्ध होते. म्हणूनच महाभारतात कर्‍हाडचा उल्लेख 'कर-हाटक' (कर = नदीकाठचे + हाटक = बाजारगाव) असा करण्यात आलेला आहे.

कर्‍हाड नगराचे सर्वात अविस्मरणीय वैशिष्ट्य हे की कृष्णा-कोयना ह्या दोन नद्यांच्या पवित्र प्रीतिसंगमावर हे नगर वसलेले असल्यामुळे त्याला प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्राचे माहात्‍म्‍य प्राप्त झालेले आहे. भक्त-भगवंताच्या प्रीतिसंगमावर आधारलेल्या 'सखू'च्या अद्‍भुतरम्य चरित्राला कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमाची जी नैसर्गिक काव्यमय पार्श्वभूमी लाभलेली आहे, तिच्यावर या माझ्या नाटकाची मी कटाक्षाने उभारणी केली आहे, हेच माझ्या नाटकाचे सर्वात आकर्षक नाविन्य आहे. म्हणूनच या नाटकाला मी 'प्रीतिसंगम' हे अमृतमधुर नाव दिले आहे.

ज्या दोन नद्या एकमेकांना काटकोनात न मिळता प्रणयी युगुलाच्या चुंबनाप्रमाणे समोरासमोर त्यांचे ओष्ठमीलन होते, त्या संगमाला 'प्रीतिसंगम' म्हणतात. कृष्णा नि कोयना ह्या नद्या सह्याद्री पर्वतामध्ये, महाबळेश्वरनजीक, जवळ जवळ उगम पावून विरुद्ध दिशांना वाहात जातात आणि कर्‍हाडजवळ पुन्हा एकत्रित होतात. कर्‍हाडच्या वायव्येकडून संथपणे वाहात येणारी कृष्णा कर्‍हाड शहराजवळ येताना दक्षिणवाहिनी होते आणि पश्चिमेकडून धावत येणारी कोयना कर्‍हाडजवळ आल्यानंतर उत्तराभिमुख होऊन कृष्णेला सामोरी जाते. त्या दोघींचा 'प्रीतिसंगम' शहराच्या निकट, वायव्य दिशेस होऊन कोयना ही कृष्णारूप होते.
अशा प्रकारचा दोन नद्यांचा संगम संपूर्ण भारतवर्षातच काय पण जगात नाही असे म्हणतात.
(संपादित)

प्र. के. अत्रे
'प्रीतिसंगम' या नाटकाच्या खुद्द नाटककार लिखित प्रस्तावनेतून.
सौजन्य- परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई

  इतर संदर्भ लेख

 

  ज्योत्‍स्‍ना मोहिले, विश्वनाथ बागूल