A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आली दिवाळी दिवाळी

लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी
भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी

आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी
घरोघरी जागविते माय मुले झोपलेली

घरोघरी दीपज्योती वर्षाचा मोठा सण
क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण

चार वर्षांमागे होता हात तुझा अंगावरी
कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी

आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा
कुठे मिळेल का आई तुझ्या मायेचा उबारा

तुझ्याविना आई घर सुनेसुनेसे वाटते
आणि दिवाळीच्या दिशी तुझी आठवण येते

सासरीच्या या संसारी माहेराची आठवण
आठवती बाबा-भाऊ आणि दारीचं अंगण

अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी
दारी घालिते रांगोळी माझ्यावाचून का कोणी

आई तुझ्या पायापाशी घोटाळते माझे मन
जिथे उभे अंगणांत तुळशीचे वृंदावन

दारापुढे लिंबावर साद घालतो कावळा
कोण येणार पाहुणा आतुरला जीव भोळा
रसिकहो!

ही एका सभ्य घरातल्या बहीण-भाऊ-वडिलांची गोष्ट आहे ! भाऊ हा गुन्हेगार प्रवृत्तीचा व वृत्तीचा कवी असून बहीण ही त्याला पाठीशी घालणारी आहे; वडील.. असू दे ! तुम्ही म्हणाल ही प्रस्तावना वाचण्यापेक्षा नाटक वाचलेलं काय वाईट? खरं आहे ! आणि खरं नाहीही ! नाटक वाचण्यापेक्षा पाहा ! बरं वाटलं तर मोकळेपणानं मान्य करा ! रसिक असलात तर टीकाकारही व्हा ! छिद्रान्वेषी असाल तर छिद्रं फार म्हणून टाकून द्या ! नसाल तर विणलेलं जाळं चांगलं आहे म्हणा ! ते आपल्या सहृदयतेवर वा निर्दयतेवर अवलंबून ! 'सीमेवरून परत जा !' या नाटकापाठोपाठ एक वर्षाच्या आत हे दुसरं नाटक मी लिहिलं आहे ! हे चुकून झालं ! नाही तर कमीत कमी तीन वर्ष एक नाटक लिहायला मला वेळ लागतो ! थोडा कमी बुद्धीचा परिणाम ! कळतच नाही ! कुठं काय बोलावं, कसं लिहावं. किती लिहावं ! काय करता, तारतम्य नाही ! माफ करा !

'अपराध मी केला, शिक्षा तुमच्या कपाळी !'
या अपराधातले माझे भागीदार सांगतो, म्हणजे बरीवाईट शिक्षा मला एकट्याला सोसावी लागणार नाही ! माझे पहिले साथीदार, ज्येष्ठ नटवर्य बाबूराव पेंढारकर ! माझी काही चूक नाही हो ! हे नाटक त्यांनी मला लिहायला लावलं ! गोडीगोडीनं काम करून घेण्यात प्रवीण ! हे नाटक मी केव्हा लिहायला लागलो तेमला कळलं नाही.. लिहून केव्हा पुरं झालं ते समजेपर्यंत ! जबाबदार बाबूराव ! धरा त्यांना, आणि शतायुषी होईपर्यंत सोडू नका ! अडुसष्ट वर्षांचा वृद्ध तरुण, पन्‍नाशी उलटल्यानंतर उलट्या चालीनं ३२ वर्षांचा झाला आहे. पुन्हा पहिल्या वर्षाचा होईपर्यंत त्यांनी वाट चालावी. बाळची इच्छा आहे, त्यांनी माझ्याएवढं व्हावं ज्या वेळी मी त्यांच्याएवढा असेन ! वयानं !
अपराधी नंबर दोन वसंत शांताराम देसाई ! न्यायखात्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या या माणसानं माझ्यावर मात्र अतोनात अन्याय केला ! त्यांनी चुका काढल्या आमच्या पहिल्या वाचनातच ! मी त्या सुधारल्या नसत्या तर हा अपराध घडलाच नसता- नाटक रंगभूमीवर आणण्याचा ! आप जिम्मेदार है ! मैं नहीं !
तिसरे श्री. हरिभाऊ मोटे आणि सौ. कृष्णाबाई मोटे ! उगीच चढवतात मला? चांगलं लिहिलंय म्हणतात, रडतात, हसतात; वाचताना मला वाटतं आपलं हे नाटक छान होणार, आणि मी लिहीत जातो ! सवय त्यांची; चूक माझी नाही !
या वेळी मला आणखीन दोन माणसं भेटली कोल्हापूरची. एक रावसाहेब या टोपणनावानं ओळखले जाणारे श्री. काळे आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ. विमलाबाई काळे. त्यांनी दाखविलेल्या आशा आणि दिलेला उत्साह त्यांना अपराधाच्या जबाबदारीतून मुक्त करू शकत नाही !
यानंतरचा चोर पुण्याच्या 'पूना गेस्ट हाऊस'चा तरुण संचालक चारुदत्त सरपोतदार. अहो, यानं मला स्वतंत्र खोली दिलीन्, म्हणजे लॉजमध्येच ! पण मध्ये मध्ये नाटक ऐकलंन् आणि प्रयोग चांगला झाला पाहिजे म्हणून मला दम देत आला ! आता नाटक चांगलं लिहिलं गेलंय, असं मला वाटलं. चूक कुणाची? माझी? आपण नाही मान्य करणार !
पेंटर फडके आणि जोशी ब्रदर्स बुकसेलर्स यांची दुकानं समोरासमोर अप्पा बळवंत चौकात ! एक.. नवीन नाटकं रंगभूमीवर यावीत, चालावीत म्हणून धडपडणारे, आणि दुसरे... नाटक बघितलं की साक्षी पुराव्यानिशी लेखकाला पकडून पुस्तकात छापणारे ! वेळ आली तर त्या दोघांनाही मी साक्षीला बोलावीन !
आणखी राहिले केळकर. चित्रशाळेचे श्री. केळकर ! त्यांनी या नाटकाचे सेटस् केले ! कल्पना माझी, पण सेटस् त्यांचे ! बरे सापडले !
हो ! एक गृहस्थ राहिलेच. असला सज्जन आणि सात्त्विक माणूस या प्रकरणात सापडावा हे आश्चर्य नव्हे; हा त्यांचा उद्योगच ! सुरुवातीचा अर्धा अंक ऐकल्यावर भरल्या डोळ्यांनी आणि गहिवरल्या कंठानं मला म्हणाले, "लवकर पुरं करा नाटक !" आणि मी केलं हो पुरं ! चूक झाली ! पण कारण पंडित महादेवशास्त्री जोशी !

असो, इतक्यांच्या अपराधांचा पाढा मी वाचला. मी आता आभार मानून टाकतो एकरकमी; म्हणजे चुकून चांगलं नाटक झालं तर त्यांनी मला दोष द्यायला नको !
दादरच्या 'रेक्स फोटो स्‍टुडिओ'चे वृद्ध चालक श्री. राजाध्यक्ष यांनी एक रात्रीत फोटो काढून पुस्तकात घालण्यासाठी माझ्या हातात दिले ! त्यांचा या वयातला उत्साह अवर्णनीय आहे.

झालं माझं काम- आता तुम्ही रसिक आणि हे नाटक ! तुमच्या हाती दिलंय, सांभाळून घ्या. पित्याचं काम झालंय, आता मुलाचं काम करण्यासाठी रंगपटाकडे वळतो; आणि त्यापूर्वी बरीवाईट बुद्धी देणार्‍या गजाननानच्या चरणी..
वाहतो ही दुर्वांची जुडी !
(संपादित)

बाळ कोल्हटकर
'वाहतो ही दुर्वांची जुडी' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमाआवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- मीनल प्रकाशन, कोल्हापूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.