A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आली कोकणगाडी दादा

लाल बत्ती हिरवी झाली आली कोकणगाडी
आली कोकणगाडी दादा आली कोकणगाडी

ठाणे-मुंब्रा-कल्याणाची ओलांडुन खाडी
आली कोकणगाडी दादा आली कोकणगाडी

जंक्शन आता मागे गेले
पनवेलीचे ठेसन आले
ओढ लावी कर्नाळ्याची हिरवी हिरवी झाडी

आपट्यापासून गाठिल रोहे
तयार ठेवा नारळपोहे
स्वागताला कोकणवासी सजले खेडोपाडी

कशासाठी पोटासाठी
कोकणपट्टी घाटासाठी
आगिनगाडी नागिण जैसी जाते नागमोडी

दर्यावरचा खाइल वारा
पिऊन घेइल पाऊसधारा
बघता बघता मागे टाकील सावंताची वाडी

येथे डोंगर तेथे सागर
नारळ पोफळ हिरवे आगर
कणखर काळ्या सह्याद्रीची थडथडणारी नाडी

सरता कोकण पुढती जाते
गोव्यासंगे जुळवी नाते
कर्नाटक अन्‌ केरळ-तामिळ प्रेमे यांना जोडी

कोकणवासी जनतेलाही
भवितव्याची देते ग्‍वाही
सुखी होउ दे गावित कोळी कष्टाळू कुळवाडी

शिंग तुतारी झडला ताशा
फळास आल्या अपुल्या आशा
कोकणच्या कैवारी नाथा ! आशिर्वादा धाडी
गीत - वसंत बापट
संगीत - मिलिंद करमरकर
स्वर- मिलिंद करमरकर
गीत प्रकार - कविता
आगर - शेत, मळा.
ग्वाही - खात्री.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.