A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आता कशाला उद्याची बात

मराठी -
आता कशाला उद्याची बात? बघ उडुनि चालली रात
भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ, चल बुडुनि जाऊ रंगात
हा ज्वानीचा बहार - लुटू या, भरवसा न ज्वानीचा
दो दिन ही साथ, हासत करि घात

हिंदी-उर्दू -
फूल सा जिस्म पूरबहार में हाऽऽऽय
आ लिपट् यिसका लुत्फ.. प्यार में हाऽऽऽय
यिस जवानी का ऐतिबार नहीं,
सुन जईफी भी यिंतजार मे हाऽऽऽय

गुजराथी -
कंसार राखिया घेवर तारे काजे
पकवान पड्यां सामे खाईले आजे,
कारण, ते स्वाद हशे नही,
ते दात हशे नही, काल केम खाशे..

पंजाबी -
वेख चंबेने पयला पाईया, मोती दिया, आजा लुटलै
मौज बहारा ते कन्‍नरंगिया, मेरे सुगंधिया, टुटण तराऽऽऽऽ

बंगाली -
खोलो आजि खोलो नोयोनो दुआर
शोंधाय आनू बोने, शोंधो मुनीरो बोने, शोंधो मुनीरो रूपे, ऐशे छेजो आज
केजाने प्रॉभाते रॉबे आखिते निशा, केजाने प्रॉभाते हॉबे आजी ए निशा
कृष्णो छुडार पाछे ,चौंपा जे मृदु हॉशे,
होयतो ए मॉनी कोभू, हाशिबेना आर

मल्याणम्‌ -
इन्‍निशै गानतिल्, वीणयिन्‍नादमु, ओलेकुम् संगेदतै, नूर् मयुडंकेली
एन्‍नेनिल नाळ्डयो, शेविहळ् मंगिडलामे
वानूर् पुख्हळ् गानम् वामुडनेइपोदे
गीत - अनंत काणेकर
संगीत - मा. कृष्णराव
स्वर- शांता हुबळीकर
चित्रपट - माणूस
गीत प्रकार - चित्रगीत
असाही 'माणूस'

'कशाला उद्याची बात' या 'माणूस' चित्रपटातील गाण्याचे प्रत्येक कडवे वेगवेगळ्या भारतीय भाषेत रचलेले होते. शब्दांना त्या त्या प्रदेशातील संगीताच्या तालात व लयीत बसवणे ही कामगिरी संगीत दिग्दर्शक मास्टर कृष्णराव यांनी पार पाडली होती. हे काम इतके चपखल झाले होते त्या काळातील बहुतेक जण कायम या गाण्याचे शब्द गुणगुणत असत. 'माणूस' चित्रपट प्रदर्शित होऊन नुकतीच ७५ वर्षे झाली. त्यानिमित्त कृष्णराव यांच्या कन्येने त्या वेळच्या आठवणींना दिलेला उजाळा..

नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्‍या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांना चित्रपटसृष्टीत आल्यावर मधुबनातील कदंब वृक्षाखाली राधेची विसरलेली पैंजणे सापडली, आणि त्यांच्या स्वररचना तरल झाल्या.
मी शाळेत असताना परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत निबंधाचा विषय आला होता, माझा आवडता चित्रपट! आणि मी माझ्या अत्यंत आवडत्या 'माणूस' या चित्रपटाबद्दल निबंध लिहिला, त्याला पहिला नंबर मिळाला. माझे प्रभात व नंतर राजकमलमध्ये येणे-जाणे होते. (प्रभातमध्ये अभिनेत्री बेगम पारा यांच्याशी बॅडमिंटन तर ‘राजकमल'मधील हरणांशी खेळायला आवडायचे शिवाय प्रभातमध्ये आमच्या मोटारीतून किंवा मा. छोटू यांच्या सायकलीवरून भरपूर हिंडायला मिळायचे.) अण्णांना (शांतारामबापूंना) मी माणूस वरील निबंध दाखविला. तेव्हा ते म्हणाले, "अगं, तुला जर देवाने एवढी सूक्ष्म स्मरणशक्ती दिली आहे, तर तू हे सर्व लिहून काढ !" (त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी पुढे 'लख लख चंदेरी' या गीताबद्दल लिहिले. त्याच वेळी योजले, की माणूस चित्रपटाच्या प्रायोगिक संगीताबद्दल लिहायचे. त्यातून अण्णा सुप्रसिद्ध चार्ली चॅपलीनबद्दल म्हणाले, "चॅपलीन स्वत: संगीतकार असल्याने त्यांनी 'माणूस'च्या संगीताचे कौतुक करून त्यातील 'तारर नाव नाव' या अर्थहीन गीताचा व त्यात वाद्याऐवजी ह्युमन व्हॉइसचा उपयोग केल्याचा उल्लेख केला."

‘माणूस' चित्रपटाचे चित्रीकरण मला तुरळक आठवते. त्यातील पोलीस-परेड मात्र स्पष्टपणे आठवते. (या परेडच्या संगीतासाठी मास्तर मैदानावर जात असत, तेव्हा पोलीस-व्हॅन त्यांना न्यावयास आली असताना थोरल्या काकांनी हंबरडा फोडला आणि गैरसमजाने मास्तरांच्या वन्दे मातरम लढ्याचा उद्धार केला.) तसेच बुवासाहेब निंबाळकरांचा व तानीबाईंचा लाडूची देवाणघेवाण करण्याचा शॉट ठळक आठवतो. मला कोणीतरी खाऊ म्हणून लाडू दिला होता. रेकॉडिर्ंग स्टुडिओत तर माझा मुक्कामच असायचा, त्यामुळे बर्‍याच गीतांचे ध्वनिमुद्रण माझ्या कानावर नकळत पडले आहे. ('तारर नाव नाव' तर मी भातुकलीच्या खेळातील कप-बशी घेऊन, नाच करून म्हणायची.) आमचे घरही माणूसमय संगीताने भारलेले होते. भक्तिरसप्रधान चाली देण्यात खासियत असताना माणूससारख्या धाडसी, वेगळ्या चित्रपटाची संगीत-जबाबदारी मास्तरांवर देण्यात अण्णांचा मास्तरांबद्दलचा ओरिजनल म्युझिक डायरेक्टर (हे त्यांनी शांतारामात लिहिलेही आहे.) हा दृष्टिकोन सिद्ध होतो.

'माणूस' ('आदमी' हिंदीत)चे संगीत हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे; परंतु थोडक्यात लिहायचे तर टायटल म्युझिकपासून मास्तरांचे वैशिष्ट्य, षड्ज बदलण्याची खासियत (ही खासियत मला सुप्रसिद्ध सिनेसंगीत दिग्दर्शक जयदेव यांनी सांगितली.) मधेच अचानक लावला गेलेला निषाद, हे सर्व आढळून येते. एवढेच नाही तर मास्तरांनी षड्ज हा प्रभातचा ट्रेडमार्क जी तुतारी, तिचाच षड्ज लावला आहे. फक्त सुरुवातीलाच पुरुष पावलांमागे स्‍त्रीची पावले सरळ वाटेवर चालत आहेत, असे असताना मास्तरांनी हे स्थैर्य आठ मात्रांचा षड्ज लावून दाखविले व पुढे याच दृष्यात दरी येताच स्वर निषादावर घसरतो. टायटल संपताना एकटी राहिलेली पुरुष-पावले भरभर चालतात तेव्हा मँडोलीन वापरले आहे. विशेष म्हणजे, कोरसमध्ये आवाज कमी पडला तर, त्यात स्वत: मास्तर गात असत. चहावाल्या रामूचे काम करणारे राम मराठे हे मास्तरांचे शिष्य. काही वर्षे ते आमच्या घरी राहत होते. माझा जन्म तेव्हाचा ! त्यांना जी गीते मास्तरांनी दिली, त्यात 'गुलजार नार न्यारी' व 'तारर नाव नाव' ही होती. दोन्ही गीते गाजली. 'गुलजार..' चे हिंदीतील 'आदमी'मध्ये रूपांतर होते 'बरजोरी करके सैय्या !' पुढील काळात 'महान' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या गायनात (पार्श्‍वगायन - किशोर कुमार) 'बरजोरी..'चा मुखडा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी योजला.

सन १९८९ ला जागतिक मराठी परिषदेत 'माणूस' चित्रपटाच्या संगीताबद्दल शांता हुबळीकर, राम मराठे आणि मी, अशा तिघांनी भाष्य केले, या वेळी 'तारर नाव नाव' या गीताचे शब्द स्वत: मास्तरांनी लिहिले होते.' असे रामभाऊ म्हणाले, तर "मास्तरांच्या विविध प्रकारच्या चाली ऐकायला सोप्या तर गायला कठीण आहेत." असे शांताबाई म्हणाल्या. त्यांनी गृहस्थाश्रम घेतल्यावर, त्यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील बंगल्यावर मी गेले की, त्या 'कशाला उद्याची बात' हे गीत पूर्णपणे गाऊन दाखवित असत. मीही या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलून एक मजेदार आठवण सांगितली. या चित्रपटातील कशाला उद्याची बात या गीताला मास्तरांनी अत्यंत आकर्षक चाल दिली. ज्याच्या-त्याच्या तोंडी हे गीत घोळत होते व अजूनही घोळत आहे. मास्तर गिरगावात चाहत्यांकडे नेहमी जात. ते आले आहेत, हे वृत्त वार्‍यासारखे पसरायचे. तेव्हा एक फेरीवाला, सायकलवरून बटाटेवडा विकणारा मोठ्याने गात हिंडायचा व मास्तर ज्या घरी आले आहेत तेथे थांबून गायचा, "माझा बटाटेवडा क्या बात, कृष्णामास्तर आवडीने खात.." यामुळे त्याचे सर्व वडे विकले जायचे. तसेच प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर म्हणाले, "मास्तरांचे श्रेय असे की, त्यांनी चित्रपटसंगीताला प्रथम स्वतंत्र अस्तित्व दिले."

या 'कशाला उद्याची बात' गीतामध्ये विविध भाषांची कडवी होती. ती त्या-त्या भाषिकांनी लिहिली होती. मात्र, मास्तरांना त्या भाषेतील संगीताचा लहेजा चांगलाच माहीत होता. कारण त्या भाषांच्या प्रांतात मास्तरांच्या अनेक मैफली झाल्या होत्या. देशात सर्वत्रच त्यांचे जाणे होते. यातील बंगाली भाषेतील कडवे संगीतकार अनिल विश्‍वास यांनी लिहिले होते; परंतु त्यांना खात्री नव्हती की एक मराठी संगीतकार योग्य चाल देईल का? पण पुढे मास्तरांची स्वररचना त्यांना आवडली. संगीतकार सचिनदेव बर्मन हे मास्तरांचे चाहते होते. ते मास्तरांचे चित्रपट पाहायला पुण्याला येत असत. चित्रपट मुंबईला प्रकाशित होईपर्यंत वाट पाहत नसत. त्यांना 'कशाला..' हे गीत फारच आवडले. त्यांनी शबनम चित्रपटासाठी शमशाद बेगम यांच्याकडून तसेच अनेकभाषी गीत ('ये दुनिया रूप की चोर') गाऊन घेतले. अजूनही 'कशाला..' हे गीत लोकांच्या मनात ताजे आहे. 'मेड इन चायना' या मराठी चित्रपटात हे गीत वापरले आहे. ते हिंदी पार्श्‍वगायिका सुनिधी चौहान यांनी गायले. मी चित्रपट-दिग्दर्शक कोल्हे यांना त्याबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले, "मी बालवयात सतत हे ‘हॉन्टींग साँग' गात असे. याचे शब्द मला येत नसत; पण चाल मात्र व्यवस्थित गात असे."

माणूस चित्रपटातील आणखी एका विशिष्ट गीताबद्दल प्रसिद्ध संगीतकार श्रीकांतजी ठाकरे यांनी मास्तरांच्या जन्मशताब्दीबद्दलच्या लेखात उल्लेख केला. ते म्हणाले, "शांता हुबळीकरांचे 'जा.. मुशाफीर तू रे' या गीतात मास्तरांची कल्पनाशक्ती दिसते, ती यामधील भजनाचा कोरस व मुख्य गीत यांमधील वेगवेगळे स्केल व ताल यांमुळे !" यातील प्रदीर्घ जाचा वापर संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी त्यांच्या 'आ.. जाने जा' या गीतामध्ये वापरला आहे. तीन दशकांपूर्वी गायिका अभिनेत्री नूरजहान मुंबईला आल्या असताना झालेल्या कार्यक्रमात मी मास्तरांचे चित्रपटगीत गात असताना, विंगमधून कोणीतरी माझ्याबरोबर गात होते. तो पुरुष- स्वर होता. मी ग्रीनरूममध्ये गेल्यावर संगीतकार नौशादजींनी माझा हात धरून मला एका व्यक्तीपुढे उभे केले व म्हणाले, "तुझ्याबरोबर हे महाशय गात होते." ते महाशय होते- अनिल विश्‍वास!'

'आदमी' (हिंदी) चित्रपटातील 'प्रेमनगर मे प्रेमबजरिया' (गीतकार मुन्शी अझीझ) या गाण्याच्या ओळी शीर्षकगीतात असलेली मालिका एका परदेशी दूरदर्शन वाहिनीवर मी पाहिली, तेव्हा 'माणूस' चित्रपटाच्या गीतांनी अटकेपार झेंडा लावला, हे कळले.

"आसामच्या जंगलात मी मा. कृष्णरावांच्या आदमी चित्रपटातील सर्व गीते गात असे." प्रसिद्ध संगीतकार भूपेन हझारिका यांनी मला सांगितले. एका प्रसंगी, प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने यांनी मला खास सांगितले, "मास्तरसाहेबांनी 'माणूस' चित्रपटासाठी माझा आवाज व गायन या दोन्हीची ऑडिशन घेतली होती, कारण गणपतच्या प्रमुख भूमिकेसाठी माझी स्क्रीनटेस्ट घेण्यात आली होती." मास्तरांच्या जन्म-शताब्दीला स्वत:हून आवर्जून उपस्थित असलेले संगीतकार नौशाद यांचे भाषण (ध्वनिमुद्रित आहे) झाले. ते म्हणाले, "मास्टरजींची चित्रपटगीते देशभर गाजली. ही गीते जेथे गेली, तेथे 'प्रभात'चे नाव गेले. हा संगीतकार दिसतो तरी कसा? हे पाहण्यासाठी मी लखनौहून पुणे येथे गेलो. त्यांचे बोट धरून मी संगीतक्षेत्रात चाललो." नौशादजींनी मास्तरांच्या वाद्यमेळातील स्वर-समूह (म्युझिक पिसेस) त्यांच्या गीतांत वापरले आहेत. आमच्या घरी संगीतकार ओ. पी. नय्यर आल्यावर मास्तरांची गीते पूर्णपणे गात असत. ते बालवयात लाहोर येथील एका शिंप्याच्या दुकानात मास्तरांच्या चित्रपट ध्वनिमुद्रिका सतत लावत असत; अखेर त्या झिजून गेल्या.

मास्तरांची एक बंदिश आहे 'सदा चिरंजीव..'
तशीच ही माणूसकी !!
(संपादित)

विणा चिटको
सौजन्य- दै. लोकसत्ता (१९ सप्टेंबर, २०१४)
(Referenced page was accessed on 23 May 2021)

  इतर संदर्भ लेख