A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अधीर याद तुझी

अधीर याद तुझी जाळितसे रे दिलवर्
अशीच वाट तुझी पाहु किती मी दिलवर्?

तमात चंद्र फुले, रात रुपेरी हसते
फुलुनी हासु कशी एकटीच मी दिलवर्?

ते स्वप्‍न आज निखार्‍यांत जाहले घायल्‌
हवा तुझाच बसंती बहार रे दिलवर्‌

मदिर ध्यास तुझा छेडितसे या हृदया
बहाल जन्म अता तुजवरती रे दिलवर्‌
तम - अंधकार.
दिलवर - शूर / धाडसी.
मदिर - धुंद करणारा.
'अधिर बाद तुझी जाळीतसे रे दिलवर'. वंदना विटणकर यांनी गजलचं लेखन केले. सगळे मराठी कवी काफियेवाले. न सांगितलं तरी तीच गजल लिहितात. वंदनाताईंना मी दिलेली चाल होती शकील बदायुनी यांची 'सुकून ओ सन्‍न का उमीदवार हैं अबतक, न जाने किसलिये दिल बेकरार हैं अबतक’. यात अबतक हा रदीफ आहे नि उमीदवार नि बेकरार काफिया आहे. पण ही गजल देऊन देखील बंदनाताईंना रदीफ-काफिया असलेली गजल लिहीणं तितकं जमलं नाही. त्यांनी तसं कबूल केलं.

यात एक निराळा प्रयोग केला कारण मला वैचित्र्य हवं असतं. अनिल मोहिलेला फोन करून विचारलं, "काय रे एखादं नवीन इन्स्ट्रुमेंट आहे का? शोभाताईच्या गाण्यात वापरायचंय". तो म्हणाला, "एक आहे, रिजरामला विचारा. पर्शियन वाद्य आहे. 'कानून'. हातानं वाजवायचं असतं".

मनात विचार केला की चांगला पीस केला पाहिजे नाही तर संगीताचा कानून कभी माफ नहीं करेगा. रिजराम आला. ते वाद्य पाहिल्यावर पीस सुचला. आता पुन्हा ऐका कसा आहे तो.
(संपादित)

श्रीकांत ठाकरे
'जसं घडलं तसं' या श्रीकांत ठाकरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- चिनार पब्लिशर्स, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.