A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अगं पोरी संबाल दर्याला

अगं पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी
लाट पिर्तीची भन्‍नाट होऊन आभाली घेई भरारी

नाय भिनार ग येऊ दे पान्याला भरती
माज्या होरीचं सुकान तुज्याच हाती
नाव हाकीन मी कापीत पाऊसधारा
मनी ठसला रं तुजा ह्यो मर्दानी तोरा
जाल्यांत गावली सोनेरी मासली-
नको करू शिर्जोरी

तुज्या डोल्यांत ग घुमतोय वादलवारा
तुज्या भवती रं फिरतोय मनाचा भौरा
तुला बगून ग उदान आयलंय मनाला
तुज्या पिर्तीचं काहूर जाली जिवाला
सुटणार नाय ग, तुटणार नाय ग-
तुजी नि माजी जोरी

मी आणिन तुला जर्तारी अंजिरी सारी
मला पावली रं पिर्तीचि दौलत न्यारी
मी झुंजार ! साजिरी तू माझी नौरी
तुज्या संगतीनं चाखीन सर्गाची गोरी
थाटातमाटात गुल्लाबी बंगला-
बांदूया दर्याकिनारी
महंमद रफी यांनी एक शक्कल काढली. "दादा, एक कोली गीत बनाईये !" मी वैतागलो होतो पण मैत्रीखातर "हां ठीक है !" असं म्हणालो नि सटकलोच. ते म्हणाले की, "किसी भी लडकी के साथ गाऊंगा ।" हे मात्र लक्षात ठेवलं.

नंतर गाण्याची तर्ज नि त्यासाठी शब्द हे आलेच. वंदना विटणकरांना सांगितलं लिहायला. कारण त्याचं माहेरचं नांव मेबल म्हणजे खिस्ती होतं. त्यांच्यापेक्षा चांगलं कोण लिहिणार ? त्यांनी कोळी समाजातलीच गायिका पुष्पा पागधरे हिचं नाव सुचवलं. ती आली. तिची रिहर्सल करून तिला एकदा रफीसाहेबांकडे घेऊन गेलो. तिथे आणखी एक रिहर्सल केली. त्यांनीही समाधान व्यक्त केले. तत्पूर्वी अनेक कोळी लोकांना विचारून तुम्ही याला काय म्हणता, त्याला काय म्हणता, असं विचारून घेतलं, कुठे उणे राहू नये म्हणून.

गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी गंमतच झाली. आर्टिस्ट म्हणजे वादनकार बरेच होते पण जुन्यातले नि नवीन यांचा मेळ काही जमेना नि अनिल हा सहाय्यकही नव्हता. कसंबसं केलं. पण वेळ जाऊ लागला तसा जहिरच्या डोक्यात रेहमान कीडा वळवळला. त्याने रफीसाहेबांना सांगितलं, "रफीभाई चलिए घर में मेहमान राह देख रहे हैं ।"

मी रफीसाहेबांना परिस्थिती समजावून सांगितली. यावर ते म्हणाले, "कुछ नहीं होगा सब ठीक होगा, घबराईये मत, मैं रेकॉर्डिंग खतम होने के बाद जाऊंगा ।" मला धीर आला. मी सर्व ठाक ठोक पण लवकर करू लागलो पण एकाएकी माझं ब्लडप्रेशर वाढले. तशाही स्थितीत मी रेकॉर्डिंग केले एकट्याने. संगीतकार मीच नि अरेंजरही मीच. रेकॉर्डिंग आटोपल्यावर मीच गाडी चालवून फोर्ट ते शिवाजी पार्कला घरी आलो. त्यानंतर औषध वगैरे घेतले. मध्ये काही झालं असतं तर ? काही झालं नाही कारण जगदंबा पाठीशी होती.

त्यानंतर बाजारात ती रेकॉर्ड आली नि हांऽऽ हांऽऽ म्हणता संपली.
(संपादित)

श्रीकांत ठाकरे
'जसं घडलं तसं' या श्रीकांत ठाकरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- चिनार पब्लिशर्स, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  पुष्पा पागधरे, महंमद रफी