A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मन माझें चपळ

मन माझें चपळ न राहे निश्चळ ।
घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥

आतां तूं उदास नव्हें नारायणा ।
धांवें मज दीना गांजियेलें ॥२॥

धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी ।
केलें तडातोडी चित्त माझें ॥३॥

तुका ह्मणे माझा न चले सायास ।
राहिलों मी आस धरुनी तुझी ॥४॥
तडातोडी - पृथक भाव, भेद / ताटातूट.
सायास - विषेष आयास (कष्ट), श्रम.
मनासी टाकिले मागे
गतीसी तुळणा नसे

माझे आजोबा मला 'मारुती स्तोत्र' शिकवत होते. मला वाटतं मी चार वर्षांचा होतो. 'भीमरूपी महारूद्रा'पासून सुरू केलेलं स्तोत्र 'मनासी टाकिले मागे'पर्यंत आलं आणि मी आजोबांना विचारलं, 'मनासी टाकिले मागे, म्हणजे? कोणाला मागे टाकलं?' आजोबा म्हणाले, वीर हनुमान पवनपुत्र होता. त्याचा वेग खूप जास्त होता. तेवढा वेग फक्त आपल्या मनाचा असतो आणि हनुमानाने मनाला सुद्धा मागे टाकलं. आजोबांच्या हावभावासकट ते वाक्य लक्षात राहिलं. अर्थ मात्र फार समजला नाही.. पुढे हळूहळू समजत गेलं, पटत गेलं. मनाचा वेग.. क्षणात हळवं, क्षणात चौफेर उधळणारं, क्षणात एकटं, दुसर्‍या क्षणी क्रूर, कपटी, कधी एकदम पवित्र. मला वाटतं समर्थांनी लिहिलेल्या 'मनासी टाकिले मागे..' या ओळीशी मी थांबलो, ही माझी आणि शब्दांची पहिली भेट. शब्द नावाच्या गुहेत किती काय काय सापडेल ह्याची ती पहिली झलक. 'मनाचे श्लोक' आणि 'करुणाष्टके' हे दोन्हीही त्यातला विचार, वृत्त, मात्रा, अनुप्रास आणि उच्चारशास्त्र सर्व दृष्टीने एक वस्तुपाठ आहे, असं मला कायम वाटतं. कविता लिहिणार्‍यांनी अभ्यास म्हणून या दोन्ही गोष्टी पुन्हापुन्हा वाचणं आवश्यक वाटतं.

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावे

किंवा
चपळपण मनाचे मोडिता मोडवेना
सकल स्वजनमाया तोडता तोडवेना

सारख्या ओळींमधून समर्थांनी इतक्या समर्थपणे मनाविषयी विचार सांगितले आहेत आणि म्हणूनच आवडत्या कवींची माझी यादी सुरु होते, ती संत कवींपासून !

शाळा-कॉलेजमध्ये असताना, 'मन' या विषयावर आधारित कवितांची झालेली जी गाणी ऐकली ती मनात आजही खोलवर आहेत. सुधीर मोघेंनी मनावर अनेक उत्कृष्ट कविता लिहिल्या. श्रीधर फडके ह्यांचं संगीत असलेलं,
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्‍नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा?

हे त्यातील एक.
चेहरा मोहरा ह्याचा कुणी कधी पाहिला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही ह्यांच्याविण दुसरा नाही
या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा?

ह्या माझ्या अतिशय आवडत्या ओळी. संगीतकाराच्या चालीवर इतकं नेमकं लिहिण्याची ग. दि. माडगूळकर आणि शांताबाई शेळकेंची परंपरा सुधीर मोघेंनीं अतिशय समर्थपणे चालवली.

मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झर्‍यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा

या ग्रेसच्या ओळींना केलेल्या चालीवर मनाविषयी संपूर्ण वेगळा विचार मोघेंनीं लिहिला आणि हे सुंदर गीत तयार झालं.

सुधीर मोघेंनीं लिहिलेली मनावरची अजून एक अप्रतिम कविता म्हणजे,
मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?
तुझ्यापरी गूढ सोपे, होणे मला जुळेल का?

'कळत नकळत' या चित्रपटासाठी आनंद मोडक ह्यांनी संगीतबद्ध केलेली ही एक अप्रतिम कविता. घुसमट, घालमेल, अगतिकता सगळं काही व्यक्त करणार्‍या आनंद मोडकांच्या या गाण्याची माझ्या हृदयात खूप खास जागा आहे.

'मन' आणि 'सुधीर मोघे' ह्यांचं खास नातं,
माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले
मधून कवी-संगीतकार म्हणून मोघेंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.

'विठ्ठल विठ्ठल' या मी संगीत दिलेल्या पहिल्याच चित्रपटात एका प्रसंगासाठी मी अभंग निवडला-
मन माझे चपळ, न राहे निश्चळ
घडी एकही पळ स्थिर नाही

तुकाराम महाराजांनी ह्यात,
धाव घाली पुढे इंद्रियाचे ओढी
केले तडातोडी चित्त माझे

म्हणत इंद्रिय सुखाच्या मागे अगतिकपणे धावणारं मन मांडलं आहे. मनावरची गाणी करतांना त्यात एक संवाद असतो असं जाणवतं. कवी आणि मन, संगीतकार आणि मन आणि मग कवी, कविता आणि संगीतकार अशी तिघांचं मिळून एक मन !

तुझे मन तुझे मन निळे निरभ्र आकाश
तुझे मन तुझे मन सौम्य शुक्राचा प्रकाश

बा. भ. बोरकरांची कविता स्वरबद्ध करताना मला पहिल्यांदा कवितेमधून, मनाच्या अस्वस्थतेपलीकडे एक शांत, प्रसन्‍न मन भेटलं. आपल्या प्रिय व्यक्तीचं मन सुंदर असेल तर-
तुझे मन गार गाढ कुळागरातली तळी
उदासीच्या एकांतात पितो ओंजळी ओंजळी

असं वाटू शकतं.

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

ही सुरेश भटांची कविता मी १९९९ मध्ये स्वरबद्ध केली. तेव्हा जाणवलं होतं की, मनाच्या पडद्यावर तुम्ही कोणताही चित्रपट पाहू शकता !!

आजच्या पिढीतला संदीप खरे-
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात !
मन नाजुकशी मोतीमाळ, तुझ्या नाजुकशा गळ्यात

असा व्यक्त होतो आणि
मन धावरे, चंचल पण सरळ आहे
मी त्याला वळण लावतो

अशा ओळींमधून माणूस आपल्या मनाला किती वेठीला धरतो हे सुद्धा सांगतो.

सौमित्रने लिहिलेलं,
तुझे धावणे अन् मला वेदना
माझिया मना जरा थांब ना !!

हा विचार सुद्धा अगदी नेमका !

मन वाहत्या पाण्याचे पालापाचोळा ठरेना
खोल घावाचीही रेघ, चार पळेही टिकेना

ही कविता स्वरबद्ध करताना, या कवितेतून मनाची ताकद आणि मनाचा कोडगेपणा जाणवला.

अनेक संगीतकारांची 'मन' या विषयावरची गाणी ऐकताना एक गोष्ट समान असलेली जाणवली, की सगळ्याच स्वररचना ह्या काहीशा नाजूक प्रकृतीच्या आहेत. खूप जास्त लयीत केलेली किंवा भारंभार वाद्य वापरलेली मनावरची गाणी नाहीत. मुळात इतक्या नाजूक विषयाला हात घालायचा तर काही गोष्टी स्वाभाविकपणे येत असाव्यात. 'रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा'मध्ये ज्ञानेश्वरमाउलींनी मनाला भ्रमराची उपमा दिली आहे. ह्या गाण्यात केलेला बासरीचा वापर, मनाचा अस्वस्थपणा नेमकेपणाने दाखवतो. बहिणाबाई चौधरींनी सुद्धा 'मन वढाय वढाय' म्हणत मनाच्या व्याप आणि मनाला होणार ताप दोन्ही गोष्टी अतिशय समर्पक पद्धतीने मांडल्या आहेत. अगदी अलीकडे मनावरची एक कविता वाचता वाचता त्यात गाणं दिसलं, अजून ध्वनिमुद्रित सुद्धा झालं नाही इतकं नवीन. हे गाणं करताना गळा दाटून आला. आपण सगळ्यांची चौकशी करतो, काळजी घेतो, पण आपलं मन? त्याला काय होतंय, हे खरंच विचारतो का आपण?

ग्रेसची ही एक नेहमीप्रमाणेच अस्वस्थ करणारी कविता-
माझ्या मना तुला रे दुखते कुठे कळू दे
अस्थिर, चंचल असणारं मन, निरभ्र असणारं मन, देव आणि सैतान दोघांचाही वावर ज्यात सहज होऊ शकतो असं मन.. ते जेव्हा दुखतं, तेव्हा नेमकं कुठे दुखतंय? काय आहे नक्की ज्याचा त्रास होतोय? ग्रेसची कविता अस्वस्थ करते. खरंच मनाला गृहीत धरतो का आपण? त्याला दुखत असतं, पण आपण फरपटत नेतो त्याला. तुकाराम महाराज म्हणतात तसं 'इंद्रियांच्या मागे'..

मनावर कितीही लिहिलं तरी ते अपूर्ण राहणार आणि मन नेहमीच एक गूढ राहणार. म्हणूनच तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात-
तुका म्हणे माझा न चले सायास
राहिलो मी आस धरुनी तुझी
मन माझे चपळ न राहे निश्चळ !!

(संपादित)

सलील कुलकर्णी
सदर- कवितेचं गाणं होताना
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाईम्स (२६ नोव्हेंबर, २०१७)
(Referenced page was accessed on 08 August 2025)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.