A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
संतांचिया गांवी प्रेमाचा

संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ ।
नाहीं तळमळ दु:खलेश ॥१॥

तेथें मी राहीन होऊनि याचक ।
घालितील भीक तेचि मज ॥२॥

संताचिया गांवी वसे भांडवल ।
अवघा विठ्ठल धन वित्त ॥३॥

संतांचे भोजन अमृताचे पान ।
करिती कीर्तन सर्वकाळ ॥४॥

संतांचा उदीम उपदेशाची पेठ ।
प्रेमसुख साट घेती देती ॥५॥

तुका ह्मणे तेथें आणिक नाहीं परि ।
ह्मणोनि भिकारी जालों त्यांचा ॥६॥
भावार्थ-

सज्जनांच्या सहवासात प्रेमाचा वर्षाव होत असल्याने मी त्या ठिकाणी याचक म्हणून राहीन आणि जीवनाच्या दुःखातून, तळमळीतून सुटेन. सज्जन लोक आपल्या ध्येयाची अहोरात्र उपासना करीत असतात. अमृतस्‍त्रावी भाषेतून सत्चरित्रे ते गात असतात. सदुपदेशाची पेठ वसवून प्रेमाची देवाणघेवाण करणारे सज्जन फक्त हेच काम सतत करीत असतात. अशा समृद्ध ठिकाणी मी भिकारी म्हणून राहू इच्छितो.

तात्पर्य : सज्जनांची संगत ही सदैव फायद्याचीच असते.

डॉ. प्रा. जे. बी. शिंदे
देवमुक्त, धर्ममुक्त तुकारामांची गाथा
सौजन्य- स्वरूप प्रकाशन, पुणे-कोल्हापूर

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ