A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजून तरी रूळ सोडून

अजून तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा
आणि अजून तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पूर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन् शम्मेचे नूर
अजून तरी परवाना हा शम्मेपासून दूर
मैत्रिणीच्या लग्‍ना गेलो घालून काळा झब्बा

कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी
कुणी ओठांची नाजुक अस्त्रे वापरली हुकुमी
अन्‌ शब्दांचे जाम भरोनी पाजियले कोणी
मैखान्यातही स्मरले आम्हा मंदिर-मस्जिद-काबा

कधी गोडीने गाऊन गेलो जोडीने गाणी
रमलो ही जरी विसरून सारे आम्ही खुळ्यावाणी
सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी
अजून तरी सुटला नाही हातावरला ताबा

कोण जाणे कोण मजला रोखून हे धरते
वाटा देती हाका तरी पाऊल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहूनही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
गीत - संदीप खरे
संगीत - संदीप खरे
स्वर- सलील कुलकर्णी, संदीप खरे
अल्बम - नामंजूर
गीत प्रकार - कविता
काबा - मक्केच्या मशिदीतील पवित्र दगड.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.