A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजुनि लागलेंचि दार

अजुनि लागलेंचि दार, उजळे ही प्राची,
स्वेच्छ थंड गार झुळुक वाहतसे ताजी.

जागवी जी रम्य वेळ,
कमलादिक सुमन सकल,
का न तुला जागवि परि, कमलनयन साची?

अरुणराग गगनिं कांति,
पक्षिगणीं मधुर गीति,
या हृदयी तशी प्रीती, पुरव हौस यांची.

जीवित तुजवीण विफल,
कां मग हा विधिचा छळ?
खचित तुझी मत्प्रीती छबि तव ही माझी.

ऊठ हे मनोभिराम,
तिष्ठतसे मी सकाम;
रुदन करिं, कोठ परि मूर्ति ती जिवाची?
गीत - भा. रा. तांबे
संगीत - गजानन वाटवे
स्वर- गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- २२ मे १९०३, इंदूर.
अरुण - तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य.
प्राची - पूर्वदिशा.
मनोभिराम - आकर्षक.
सुमन - फूल.
स्वेच्छ - स्वत:च्या लहरीने वागणारा.
नोंद
बंगाली कवयित्री तोरु दत्त ह्यांनी बहिणीला उद्देशून लिहिलेल्या Still barred thy doors ! - the far east glows या इंग्रजी कवितेचे भाषांतर.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.