लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती
इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती
सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती
गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गुज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | अरुण दाते |
गीत प्रकार | - | भावगीत |
आर्त | - | दु:ख, पीडा. |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
गीत ज्यावेळी स्वरबद्ध होते, चांगला गायक ते गातो आणि अनेक श्रोत्यांसमोर एकाच वेळी मांडतो त्यावेळी, त्या गीताचा आस्वाद घेण्याची क्रिया अधिक सोपी होते आणि आकर्षकही होते. संगीताच्या माध्यमातून गीताचा प्रसार लवकर होण्यास मदत होते. म्हणूनच गीताला चाल देणारा संगीत-दिग्दर्शक हा घटकही फार महत्त्वाचा मानला गेला आहे. कारण त्याने स्वर दिल्याखेरीज 'गीत' गायले जात नाही.
(संपादित)
यशवंत देव
'शब्दप्रधान गायकी' या यशवंत देव लिखित पुस्तकातून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.