स्मरते रूप हरीचे मीरा
कमलदलापरी मिटल्या अधरी
नाम मनोहर खुलता श्रीहरि
हर्षभराने तनुलतिकेवरि पडती अमृतधारा
कालिंदीच्या नीलजलापरी
हृदयी वाहे भक्ती हसरी
तन्मयतेच्या कुंजवनी तीरी खुलवी प्रीत-फुलोरा
सालस भोळी थोर मनाची
मीरा दासी प्रभुचरणाची
मिटल्या नयनी धुंद मनाची रंगवि हसरी मथुरा
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
राग | - | अभोगी कानडा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
कालिंदी | - | यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते. |
'मृदुल करांनी छेडित तारा, स्मरते रूप हरीचे मीरा'
या गीताची आठवण होऊन आपण ते गुणगुणायला लागलो की त्याच्या परिपूर्णतेने कंठ दाटून येतो. जवळपास ५० वर्षानंतरही या गाण्याने आपण गहिवरतो, तर त्याच्या निर्मितीच्या वेळेला त्याच्या गीतकार, संगीतकार आणि गायकाला किती आनंद झाला असेल नाही ! हे गाणं आपल्या नावावर व्हायला हवं होतं.. अशी चुटपुट लावणारं असं हे सर्वांगसुंदर गीत आहे- गीतकार रमेश आणावकर, संगीतकार दशरथ पुजारी आणि गायिका सुमन कल्याणपूर यांचं.
दशरथ पुजारी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या गाण्याशी निगडित दोन गोष्टी सांगितल्या आहेत. संगीतकार वसंत प्रभूंनी एकदा त्यांना भेटायला बोलावलं. त्या वेळेला प्रभू आजारी होते. ते म्हणाले, "मी माझ्या एका अतिशय आवडत्या गीतकाराला तुमच्या हवाली करतो आहे, ज्याचं नाव आहे रमेश अणावकर."
वसंतरावांसारख्या मोठ्या संगीतकाराच्या म्हणण्याला मान देऊन पुजारींनी आणावकरांना घेऊन संगीत द्यायला सुरुवात केली. पुढे याच अणावकरांनी पुजारींकरता अनेक सुंदर गाणी लिहिली. त्यातलंच हे, 'मृदुल करांनी छेडीत तारा'. दशरथ पुजारींनी अप्रतीम चाल लावलेलं हे गीत, सुमन कल्याणपूर तितक्याच सुंदर गायल्या आहेत. ध्वनिमुद्रणाच्या वेळी काही निमित्ताने दोन असामान्य व्यक्ती तिथे हजर होत्या.. संगीतकार ओ. पी. नय्यर आणि आशा भोसले. भाषा कळणारी नसली तरी गाणं इतकं सुंदर जमलं होतं की ओपींनी संगीतकार आणि गायिका यांची मुक्तकंठाने स्तुती केली आणि त्यांच्याशी ओळख करून घेतली.. असे ते मंतरलेले क्षण होते.
शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेल्या पुजारींनी नेहमीप्रमाणे अतिशय कसदार संगीत रचना केली आहे, जी अभोगी कानडा रागावर आधारित आहे. एखादी शास्त्रीय बंदिश असावी अशी अद्द्धा तालातली ही रचना असली तरी, गीतातले भाव कुठेही कणभरही लोप पावलेले नाहीत. संगीतकार आणि गायिका दोघांचीही ही कमालच आहे. एखाद्या ख्याल गायकाप्रमाणे तालातल्या दोन मात्रांतील पूर्ण अंतर सुमनताईंनी त्यांच्या स्वरांनी आणि शब्दांनी, अक्षरांनी पूर्णपणे व्यापलं आहे. वाद्यवृंदात वाजलेल्या सतारीच्या अंगाची आंदोलनं आणि सतारीचा बाज त्यांनी गायला आहे. गीताच्या चालीला वाद्यवृंद कसा नेमका आणि पोषक असावा याचही हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. वाद्यवृंदात आणखी केवळ दोनच वाद्य आहेत; एक तबला आणि दुसरी बासरी. भावगीताचे प्रथम शब्द आणि नंतर सूर परिणामकारकरीत्या पोचवणं हा प्रथम उद्देश मानणार्या संगीतकारांना एवढा छोटा पण परिणामकारक वाद्यवृंद पुरेसा होता. या बाबतीत सुगम संगीत विश्वातील युगनिर्माते गजाननराव वाटवे यांच्या विचारपरंपरेतलेच दशरथ पुजारी असल्याने त्यांच्याकडून अशा अजरामर संगीतरचना निर्माण झाल्या.
त्या काळातले महान गायक सुधीर फडके आणि सुगम संगीतातील अत्युच्च नाव लता मंगेशकर या दोघांनी दशरथ पुजारींच्या संगीत दिग्दर्शनात एकही गाणं न गायल्याची खंत पुजारींनी त्यांच्या, 'अजून त्या झुडुपांच्या मागे' या आत्मचरित्रात व्यक्त केली आहे. पण 'मृदुल करांनी छेडीत तारा' गाण्यामुळे त्यांनी, या गाण्याच्या शिल्पकारांच्या बरोबरीने आपल्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना, असंख्य रसिकांना अपरिमित आनंद दिला आहे हे मात्र नक्की.
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.