A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अनादि मी अनंत मी

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ॥

अट्टहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गांठ घालुं मी घुसें रणीं
अग्‍नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळाऽ रिपूऽ । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतीनें भिववुं मजसि ये ॥

लोटि हिंस्त्र सिंहाच्या पंजरीं मला
नम्र दाससम चाटिल मम पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकतें
हलाऽहलाऽ । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितों ! ॥
गीत - स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- सुधीर फडके
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• काव्य रचना- १९१०, समुद्रमार्ग.
कवण - कोण ?
जई - जेव्हा.
पंजर - पिंजरा.
रिपु - शत्रु.
स्वये - स्वत:
नोंद
मार्सेलसला बोटीवरून निसटण्याचा प्रयत्‍न केला, त्याचा सूड म्हणून आपला अमानुष छळ होणार ह्या जाणिवेने, अशा छळास पुरून उरेल अशा धैर्याचा पुरवठा करण्यासाठी कवचमंत्र म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही कविता रचली.

संदर्भ-
सावरकरांची कविता
संपादक- वासुदेव गोविंद मायदेव
सौजन्य- केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.